बाळासाहेब थोरातांमुळे आम्ही बेसावध राहिलो; नाना पटोलेंची हायकमांडकडे तक्रार?

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी केलेल्या खेळीमुळे काँग्रेसची पुरती नाचक्की झाली आहे. त्याचे सारे खापर तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्यावर फोडत नाना पटोले यांनी हात झटकले आहेत. किंबहुना, तांबे प्रकरणात बाळासाहेब थोरातांमुळे आम्ही बेसावध राहिलो, अशी तक्रारही त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता, त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसला उमेदवारी गमवावी लागली. याची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडने घेत सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, या मुद्द्यावरून आता काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.

थोरातांनी दिला होता विश्वास

  • बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्यात मामा भाच्याचे नाते आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा मागचे तीन टर्म डॉ. सुधीर तांबे (सत्यजित यांचे वडील) यांना देण्यात आली आहे. मात्र, यावेळी सत्यजित तांबे हे काही तरी वेगळे करण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
  • ते भाजपच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात होते. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी सुधीर तांबे यांच्याच उमेदवारीचा आग्रह धरत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास दिला. पण, प्रत्यक्षात थोरात यांना आपल्या घरातील राजकारण हाताळता आले नाही.
  • त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय झाला. थोरात यांनी सुधीर तांबे हे उमेदवारी अर्ज भरतील, अशी खात्री दिल्यानेच आम्ही बेसावध राहिलो, अशी माहिती पटोले यांनी हायकमांडला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here