आता भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन वाद, पंकजा मुंडे काय करणार?

राज्यात एकीकडे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू असताना उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे हा संघर्ष कुठेतरी निवळत असतानाच आता बीड जिल्ह्यातील भगवान गडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद नव्याने उफाळून आला आहे.

भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकजा मुंडे समर्थक आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

तणावाचं वातावरण

भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय भाषण करण्यास भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विरोध केला होता. त्याच भगवान गडाच्या पायथ्याशी भगवान गड दसरा मेळावा कृती समितीने पुढाकार घेतला असून मुंडे समर्थक आणि कृती समितीत तणावाचं वातावरण आहे. याचाच परिणाम म्हणून आष्टीतील जय भगवान महासंघाच्या पदाधिका-यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचाः ‘माझे भाषण पूर्ण ऐका…’, मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानाचा पंकजा मुंडेंनी केला खुलासा)

वंजारी समाजात नाराजी

पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावरील दसरा मेळाव्याला अडथळा आणण्यासाठी हा दुसरा दसरा मेळावा होत असल्याचे सांगत वंजारी समाजात नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या पुढाकाराने ही कृती समिती स्थापन झाली आहे.

पंकजा मुंडेंची भूमिका काय?

भगवान गडावर फक्त एकच दसरा मेळावा होईल त्यामुळे समाजात फूट पाडण्याचे काम करू नका, अशा भावना व्यक्त करत जय भगवान महासंघाच्या आष्टी येथील सर्व पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे हा वाद आता चांगलाच तापला असून यावर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याकडे आता समाजाचे आणि बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here