सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील घराची बीड पोलिसांनी तब्बल चार तास झडती घेतली. करुणा शर्मा यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र करुणा शर्मा यांना भाजपाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात करुणा शर्मा यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा कलगीतुरा रंगणार आहे.
अधिक पुरावे मिळवण्यासाठी झडती
दोन दिवसांपूर्वी करुणा शर्मा ह्या बीड येथे आल्या होत्या, बीडच्या सुनेच्या नात्याने आपण तिथे येत असून माझे मन बीड वासियांकडे मोकळे करणार आहे, असे सांगत त्या बीडमध्ये आल्या होत्या. मात्र त्याच वेळी त्यांना विरोध झाला. त्यांच्या बीडच्या नागरिकांनी घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी शर्मा यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तूल सापडले. त्यानंतर त्यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि शर्मा यांना तातडीने अटक करण्यात आली. सध्या शर्मा पोलिस कोठडीत आहेत, त्या दरम्यान बीड पोलिस मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी सांताक्रूझ येथील त्यांच्या घराची ४ तास झडती घेतली. त्यामाध्यमातून शर्मा यांच्या विरोधात आणखी पुरावे मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. शर्मा यांनी अंबेजोगाई न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
भाजपाचा करुणा शर्मा यांना पाठिंबा
या प्रकरणी आता भाजपाने शर्मा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ऍट्रॉसिटी कायद्याचा अत्यंत चुकीचा वापर कसा केला जातो याचे बीड हे उदाहरण आहे. त्यामुळे हा खोटा गुन्हा दाखल झाला असून भाजपाचा शर्मा यांना पाठिंबा आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे बीडमध्ये आता करुणा शर्मा यांच्या माध्यमातून भाजपा आणि राष्ट्रवादी असा कलगीतुरा रंगणार आहे.
Join Our WhatsApp Community