रविवारी पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या आयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली. यानुसार राज ठाकरे हे ५ मे रोजी आयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यापूर्वी केंद्र सरकार राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देणार असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय संघटनेने धमकी दिली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून राज ठाकरेंना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.
दौऱ्यापूर्वी केंद्र वाढवणार राज ठाकरेंची सुरक्षा
मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात राज ठाकरेंनी मांडलेली भूमिकेमुळे राज्यासह देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना केंद्र सरकार विशेष सुरक्षा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सध्या राज ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा आहे. त्यात आता केंद्र सरकारदेखील त्यांना अधिकची सुरक्षा पुरविण्याच्या विचार करत आहे. यासह ५ जून रोजी ते अयोध्या दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारदेखील त्यांना त्यांच्या आयोध्या दौऱ्यादरम्यान अधिक सुरक्षा देणार असल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – येत्या एक-दोन दिवसांत भोंग्याच्या वापरावरील गाईडलाईन्स येणार)
३ मे नंतर हिंदूंनी तयार रहा, राज ठाकरेंचे आवाहन
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता राज ठाकरेंविरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असे म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी मनसेला दिला होता. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. यानंतर त्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर वक्तव्य केले होते. यावेळी ते म्हणाले, माझा मुद्दा हा धार्मिक नसून सामाजिक आहे. तर दुसरीकडे ३ मे नंतर हिंदूंनी तयार रहा, असे आवाहन केले होते. राज ठाकरेंच्या याच आक्रमक भूमिकेनंतर केंद्र सरकारकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.