तेजसच्या आगमनापूर्वी बदलतेय युवा सेना!

युवा सेनेची वाटचाल ही तेजसच्या स्वभावाला अभिप्रेत आक्रमक, राडेबाजी अशी होण्यासाठी आतापासून युवा सेना बदलण्यास सुरुवात झाली की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

210

शांत, संयमी शिवसेना युवा नेता असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेची वेगळी प्रतिमा निर्माण केली. शिवसेनेच्या आक्रमक शैलीच्या अगदी विरुध्द युवा सेनेने सनदशीर मार्गाने संघटनावाढीसाठी प्रयत्न केले. परंतु आजवर युवा सेना वाढीसाठी जे पेज थ्री कल्चर अंगीकृत केले होते, त्याच्या अगदी विरुध्द भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करत युवा सेनेने दाखवून दिले. त्यामुळे युवा सेनेचे नेतृत्व भावी काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक म्हणून वर्णन केलेल्या तेजसच्या राजकीय पदार्पणाच्या आधीची तयारी हे आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. यापुढे युवा सेनेची वाटचाल ही तेजसच्या स्वभावाला अभिप्रेत आक्रमक, राडेबाजी अशी होण्यासाठी आतापासून युवा सेना बदलण्यास सुरुवात झाली की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

…म्हणून युवा सेना राजकीय आंदोलनात उतरली!

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस यांच्या राजकीय पदार्पणाची चर्चा सध्या जोरात ऐकायला येत आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आता पक्षाचे नेते बनल्याने तसेच राज्याचे मंत्रीपद भूषवत असल्याने युवा सेनेची जबाबदारी ही सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, तेजस ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केल्यास ते युवा सेनेचे अध्यक्ष बनवून वरुण सरदेसाई यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यापूर्वी उध्दव ठाकरे यांची राजकारणातील प्रवेशाची वेळ चुकली होती. त्यामुळे त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या पक्षीय राजकारणातील प्रवेशाची वेळ अचूक शोधूनच त्यांना संधी दिली होती. त्यामुळे तेजस ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाचा मुहूर्त शोधला जात आहे. मात्र, तेजसच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरु असताना शांत आणि मवाळ असलेल्या युवा सेनेने जहाल भुमिका अंगिकारायला सुरुवात केली आहे. युवा सेना प्रमुख असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवत सुशिक्षित वर्गामध्ये आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करतानाच तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी रोड शो करत जन आशीर्वाद घेतला होता. युवा सेनेची स्थापना होण्यापूर्वी २०१०मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेने विद्यापीठात आक्रमकता दाखवली होती. त्यानंतर युवा सेनेची स्थापना झाल्यावर महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये सनदशीर मार्गाने आदोलन करणारी युवा सेना कधीही राजकीय स्वरुपाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली नव्हती. परंतु प्रथमच ते रस्त्यावर उतरले आहेत.

(हेही वाचा : होय! तेजस ठाकरे राजकारणात येतोय!)

युवा सेनेची प्रतिमा बदलणार!

आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्यावेळी अकरा वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हा आदित्य तसा शांत आहे. पण उध्दवचा धाकटा मुलगा हा कडक स्वभावाचा आहे. माझ्याप्रमाणे आक्रमक. मला जे आवडते, तेच त्याला आवडते. असे वर्णन केले होते. त्यामुळे आक्रमक असलेल्या तेजसच्या राजकीय प्रवेशाची चर्चा असताना त्या मवाळ असलेल्या युवा सेनेची प्रतिमा आक्रमक करण्याचा प्रयत्नातून हे आंदोलन झाले की काय, अशी चर्चा सुरु आहे. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, अमोल किर्तीकर, अमेय घोले, समाधान सरवणकर, पवन जाधव, निखिल जाधव, साईनाथ दुर्गे हे सुशिक्षित असल्याने रस्त्यावरील आंदोलनाऐवजी सनदशीर मार्ग स्वीकारत होते. परंतु युवा सेना ही शिवसेनेची दुसरी फळी असून मवाळ भूमिकेपेक्षा आक्रमक होणे यातच संघटनेचे हित असल्याने युवा सेना आता आक्रमतेच्या दिशेने पाऊल टाकताना दिसत असल्याचे पक्षातील जुन्या शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.