सध्या काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सोमवारी महाराष्ट्रात पोहोचली. पण त्याचवेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूच्या दिवाणी न्यायालयाने काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेसने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बेकायदेशीररित्या KGF-2 या चित्रपटातील गाणे वापरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
ज्या तीन व्हिडिओमध्ये काँग्रेसकडून KGF-2 चित्रपटातील गाण्याचा वापर करण्यात आला आहे ते ट्वीट तातडीने डिलीट करावेत. तसेच काँगेसचे अधिकृत ट्विटर हँडल @INCIndia आणि भारत जोडो @BharatJodo ही दोन्ही ट्विटर अकाऊंट पुढील सुनावणीपर्यंत ब्लॉक करण्यात यावीत, असे आदेश बंगळुरूच्या दिवाणी न्यायालयाने दिले आहेत.
(हेही वाचाः ‘…तर एकतर्फी कारवाई होईल’, राज्य महिला आयोगाची भिडेंना दुसरी नोटीस)
काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहेत. राहुल गांधी जिथे जातील तिथले व्हिडिओ,फोटो काढण्यात येऊन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. याच यात्रेमधील काही व्हिडिओंमध्ये सुप्रसिद्ध दाक्षिणात्य सिनेमा केजीएफ-2 मधील गाण्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे या व्हिडिओंवर आक्षेप घेण्यात आला आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1582956022112526338?s=20&t=imYQhULqM2if1L8fU-dUXA
एमआरटी म्युझिक कंपनीचे मॅनेजर एम.नवीन कुमार यांनी बंगळुरूच्या यशवंतपूर ठाण्यात या विरोधात तक्रार केली होती. या चित्रपचातील सर्व गाण्यांचे सर्वाधिकार हे एमआरटी म्युझिक कंपनीकडे आहेत, त्यामुळे एफआयआरमध्ये राहुल गांधी,सुप्रिया श्रीनेत आणि जयराम रमेश यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
https://twitter.com/INCIndia/status/1579838167217188865?s=20&t=ew6cgzHnDXk4y7n5Pq-LqA
न्यायालयाचे म्हणणे काय?
कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काँग्रेसवर बंगळुरूच्या दिवाणी न्यायालयाने ही कारवाई केली आहे. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे पायरसीला खतपाणी मिळू शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. याप्रकरणी 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community