छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओढवून घेतलेला वाद शमला असला, तरी आगामी निवडणुकांपूर्वी त्यांना नारळ देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती भाजपाच्या गोटातून समोर येत आहे.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात शुक्रवारी अनेक राजकीय मुद्दयावर चर्चा झाली असून, त्यात महाराष्ट्रासह चार राज्यांच्या राज्यपालांच्या नावांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या कानावर हा निर्णय घातल्यानंतर महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचे नाव जाहीर केले जाईल असे कळते.
मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा
एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नियोजित आहे. या विस्तारात महाराष्ट्रातून कोणाला संधी द्यायची याबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community