हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे सदस्य, आमदार भास्कर जाधव यांनी थेट विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंगविक्षेप करत त्यांची नक्कल केली, त्यामुळे गदारोळ माजला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली, अथवा त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. विरोधकांनी गदारोळ घातल्यावर जाधव यांनी आपण अंगविक्षेप आणि शब्द मागे घेत असल्याचे म्हटले, मात्र विरोधक माफी मागण्यांवर ठाम राहिले, त्यामुळे सभागृह २ वेळा १५ मिनिटे स्थगित करण्यात आले. अखेर भास्कर जाधव यांनी माफी मागितली.
काय म्हणाले भास्कर जाधव?
लॉकडाऊन काळातील १०० युनिट वीज बिल माफ करण्याच्या लक्षवेधीवर बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? त्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आक्षेप घेत असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केलेच नव्हते, त्यामुळे हे शब्द मागे घेण्यात यावे, असे म्हटले. मात्र त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेले विधान व अंगविक्षेप मागे घेत असल्याचे म्हटले.
काय म्हणाले फडणवीस?
त्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी, अशा प्रकारे नेत्यांचा अवमान सभागृहात करण्याची प्रथा पाडू नका, नाही तर आमच्याकडूनही अवमान केला जाईल. याचे समर्थन करता कामा नये. पंतप्रधान मोदी हे या सभागृहाचे सदस्य नाहीत, ते या ठिकाणी उत्तर देण्यासाठी येऊ शकत नाही, मग त्यांची नक्कल करणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा ‘आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवड नकोच!’)
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
एका दैनिकाने मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरला तर त्यांचा अवमान होतो म्हणून आक्षेप घेण्यात आला, मग पंतप्रधानांचा अपमान होत नाही का?, हे जर रेकॉर्डवरून काढले नाही, तर यांच्यापेक्षा आम्ही चांगल्या नकला करू शकतो. हे सभागृह लोकशाहीचा फड आहे त्यांचा तमाशाचा फड करू नका. हा पक्षाचा विषय नाही. इथे थांबवले नाही तर उद्या नवीन सदस्य टिंगल टवाळी करतील, प्रत्येक नेता अथक परिश्रमाने मोठा होत असतो, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सभागृह दोन वेळा तहकूब
दरम्यान या प्रकरणी विरोधकांनी गोंधळ घातला, त्यामुळे विधानसभा २ वेळा तहकूब करण्यात आले. तसेच सदस्यांनी कोणत्याही नेत्यांचा अवमान करू नये, अशी समज दिली, असे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले, तरीही विरोधकांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवले.
Join Our WhatsApp Community