भास्कर जाधवांना व्हायचेय विधानसभा अध्यक्ष, पण काँग्रेसचा विरोध!

भास्कर जाधव यांनी या अधिवेशनात चांगलेच काम केले. म्हणून त्यांनाच विधानसभा अध्यक्ष पद द्यावे, असे काही नाही. आमच्या पक्षातही असे सक्षमपणे काम करू शकणारे भास्कर जाधव आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

73

भास्कर जाधव…गुहागरचे शिवसेनेचे आमदार.. दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात याच भास्कर रावांची हवा पहायला मिळाली. भाजपच्या १२ आमदारांचा टप्प्यात कार्यक्रम केल्यानंतर भास्कर जाधव चांगलेच चर्चेत आले. आता याच भास्कर रावांना विधानसभा अध्यक्ष होण्याचे वेध लागले आहेत. आधीच विधानसभा अध्यक्ष पदावरून काँग्रेस नाराज असून, आता भास्कर रावांनी विधानसभा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

…तर मी विधानसभा अध्यक्ष होईन!

महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमताने विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल, तरच सेनेने स्वीकारावे असे भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये सांगितले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचेही ते म्हणाले. कोणाला काय द्यावे, कोणाला कुठे बसवावे हे तिन्ही पक्षांनी मिळून ठरवायचे असते. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले, तर चांगल्या प्रकारे काम करतील, असे मत तिन्ही पक्षांचं मत झाले आहे. शिवसेनेने आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम आहे. शिवसेनेकडे वनखाते तसेच ठेवून जर अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावे. एक तर शिवसेनेकडे महत्त्वाची खातीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेने मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावे, असे मला वाटत नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांना जर विधानसभा अध्यक्ष व्हायचे असेल, तर आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र त्यांनी त्यावेळी निःष्पक्षपणे काम करावे. तसेच विधानसभा अध्यक्ष पदाबाबत महाआघाडीमध्येच एकमत नाही, अन्यथा त्यांनी निवडणूक घेतली असती.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

काय म्हणाले थोरात?

भास्कर जाधव यांनी या अधिवेशनात चांगलेच काम केले. म्हणून त्यांनाच हे पद द्यावे, असे काही नाही. आमच्या पक्षातही असे सक्षमपणे काम करू शकणारे भास्कर जाधव आहेत, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. शिवाय जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आलेले आहे. त्यामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा अगर विचार झालेला नाही. अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होऊ शकली नाही. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया असल्याने आणि कोणाचाही हक्क डावलला जाऊ नये, यासाठी वातावरण निवळल्यावरच ही निवडणूक घ्यावी लागणार आहे, असे थोरात म्हणाले.

(हेही वाचा : गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार! प्रसाद लाडांची काँग्रेस आंदोलनावर टीका)

भास्कररावांनी असे गाजवले अधिवेशन!

विधानसभा अध्यक्षपदी तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव विराजमान झाले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणावरुन मांडलेल्या मुद्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडण्याची संधी मागितली. पण तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ती संधी नाकारल्यामुळे भाजप आमदार आक्रमक झाले. तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न भाजप आमदांरानी केला. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. सभागृह तहकूब केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले नाही, म्हणून भाजप आमदार अध्यक्षांच्या दालनात जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. अखेर तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि त्यांच्यासोबत हमरीतुमरी करुन गैरवर्तन केल्याप्रकरणी १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी मांडला. या प्रस्तावाला बहुमताने मंजूर करण्यात आले. या १२ आमदारांच्या निलंबनानंतर भास्कर जाधवांची चांगलीच हवा झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.