भास्कर जाधव घेणार संजय राऊतांची जागा?

117

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाषणे ठोकत विरोधकांना अंगावर घेणाऱ्या संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यापासून शिवसेनेचा ‘मैदानी आवाज’ काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. ही कसूर भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नवा मोहरा मैदानात उतरविण्याचे ठरविले असून, भास्कर जाधव यांच्या खांद्यावर ती जबाबदारी देण्यात आली आहे.

कोकणात ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटातील आणखी काही आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या सगळ्यात भास्कर जाधव यांचे नाव कुठेही नाही. याऊलट शिंदे गटालाच ते नको असल्याची माहिती कानावर पडत आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत जाधव पक्ष सोडण्याची शक्यता नसल्याची बाब हेरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना नवी जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. पावसाळी अधिवेशनात भास्कर जाधव वगळता उद्धव सेनेतील एकाही आमदाराच्या चेहऱ्यावर आक्रमकता दिसून आली नाही. एकटे जाधव पोटतिडकीने ठाकरे गटाची बाजू लावून धरत होते. त्यामुळेच अधिवेशनानंतर त्यांना नेतेपदी बढती देण्यात आली. आता संजय राऊत यांची जागा देत कोकणात ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न उद्धव गटाकडून केला जात आहे.

(हेही वाचा मुंबईत यंदा बाप्पा वाढले : तब्बल २८ हजार ९३३ पेक्षा अधिक गणेश मूर्तींची झालेली प्रतिष्ठापना)

रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात

गणेशोत्सवानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार असून, माझ्याकडून त्यांना काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेईन. त्यानंतर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचे भास्कर जाधव यांनी गुहागरमधील मेळाव्यात जाहीर केले. बंडखोर आमदारांना आव्हान देताना ते म्हणाले की, तुम्ही मर्दाची अवलाद असाल, तर आमदारकीचा राजीनामा द्या. तुम्ही सच्चे आहात की बदमाश, हे जनतेला ठरवू द्या. शिवसेना व ठाकरे हे अतूट नाते आहे. ते कोणीही तोडू शकत नाही. भाजपला तुम्ही फक्त सत्तेपुरते हवे आहात. ईडी चौकशीनंतर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ झाले. या उपऱ्यांमुळे भाजपमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.