Bhima Koregaon Violence Case: वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वरवरा राव यांना वैद्यकीय कारणावर जामीन देण्यात आला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये वेगवेगळ्या आरोपांखाली वरवरा राव यांना अटक करण्यात आली होती. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत वरवरा राव यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

(हेही वाचा – नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री)

गेल्या दीड वर्षांपासून अटकेत असलेल्या वरवरा राव यांनी जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला नाही. त्यामुळे या निकालाविरुद्ध राव यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. अखेरीस राव यांना तब्येतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अरुण परेरा, वर्णन गोंसालवीस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरवरा राव या कथित शहरी नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती.

परंतु, नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी परेरा, भारद्वाज, गोंसालविस यांना अटक केली होती. त्यानंतर वरवरा राव यांनाही अटक केली होती. वरवरा राव यांच्यावर नक्षलवादी संघटनेतील लोकांशी संबंध ठेवणे, नेपाळ आणि मणिपूर येथून दारुगोळा खरेदीचे नियोजन करणे, लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथून टाकण्याचा कट करणे, अशा प्रकारचे अतिशय गंभीर आरोप आहेत.

भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचे वातावरण ढवळून निघाले होते. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला 200 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये अनेक डाव्या विचारांचे लोक उपस्थितीत होते. या एल्गार परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठा हिंसाचार उसळला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here