शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता त्यांनी दादर मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात शिंदे गटात वर्चस्व दादर-माहीम विधानसभा क्षेत्रात राहावे यासाठी आमदार सदा सरवणकर यांनी विविध गणेश विसर्जन स्थळ आणि सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ठिकाणी प्रवेश द्वारावर गणेश भक्तांना शुभेच्छा देणाऱ्या कमानी उभारत त्याद्वारे शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. या माध्यमातून त्यांनी दादर -माहीम मधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्या शाखेवरील फलकावर असलेला फोटो आणि नावाला माजी महापौर आणि शिवसेना नगरसेवक आणि मिलिंद वैद्य यांनी काळे फासण्याचे प्रयत्न केले होते. हे एकमेव आंदोलन वगळता विभागात पुढे शिवसैनिक तेवढा आक्रमक दिसला नाही. वैद्य आणि सरवणकर यांचे राजकीय हेवेदावे असल्याने त्यांनी पुढाकार घेतला होता. पण या व्यतिरिक्त कुणीही पुढाकार घेताना दिसले नाही. पण हा अपवाद वगळता सर्व शिवसैनिक विभागात शांत असून ते सरवणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही.
परंतु आज शिवसेनेच्या विविध शाखांच्या परिसरात सदा सरवणकर यांचे नाव आणि फोटो असलेले फलक झळकताना दिसत आहेत. दादर- माहिम विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे बोलले जात असले तरी या बालेकिल्ल्यावर शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच सदा सरवणकर यांनी आता संपूर्ण मतदारसंघात शिंदे गटाचे सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात महत्त्वाची विसर्जन स्थळे असलेल्या दादर,माहीम आणि प्रभादेवी या समुद्र चौपट्यांवरील विसर्जन स्थळावर सदा सरवणकर यांचे फलक झळकतात आणि शिंदे गटाचे पदाधिकारी यांची छायाचित्र झळकणारे कमानी उभारण्यात आले आहेत. या कमानींवर ठेवू हिंदुत्वाचे भान. . . वाढवा उत्सवाची शान अशाप्रकारे संदेश देण्यात आला आहे.
या कमानीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राहुल शेवाळे आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर आदींसह शिवसेना पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे आहेत. या सर्व ठिकाणी शिवसेनेच्या कमानी असायच्या. परंतु यावेळी या कमानी व फलकांची जागा शिंदे गटाच्या सरवणकर यांनी घेतली आहे.
Join Our WhatsApp Community