सध्या अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत घोटाळा झाल्याचे सांगत काँग्रेसने भाजपविरोधात देशभर रान पेटवले आहे. यातच राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेनेने सुद्धा या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या युवा मोर्चाने शिवसेने विरोधात आंदोलन छेडले. शिवसेनेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाने दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. त्याचवेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेना भवनासमोर गर्दी केली. त्यामुळे सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली.
काय झाले नेमके?
भाजपकडून या फटकार मोर्चाचे नेतृत्त्व तेजिंदर सिंग यांच्याकडून करण्यात आले. राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरुन चालू असलेल्या वादावरुन शिवसेनेने टीका केली होती. त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी भाजपने आंदोलन केले. भाजपच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी शिवसैनिकही सेने भवनाभोवती जमेल आणि त्यांच्यात बाचाबाची होण्याचा प्रसंग उद्भवला. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
https://youtu.be/HJ2zP3O4M3Y
सोनिया सेनेच्या नावाने घोषणा
बुधवारी दुपारी भाजपचे कार्यकर्ते घोषणा देतच राजाराणी चौकात आले. यावेळी ‘सोनिया सेना हाय हाय’च्या अशी नारेबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर तुफान हल्ला चढवला. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करुन त्यांना व्हॅनमध्ये कोंबले.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांना घेऊन पोलिसांची गाडी छ. शिवाजी महाराज उद्यानाकडे दात असताना काही शिवसैनिकांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला. आंदोलकांची धरपकड करण्यासाठी शिवसैनिक धावले. त्यामुळे यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत हाणामारी केली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसैनिकांनाही ताब्यात घतले आहे.
माहीम पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारी प्रकरणी ८ ते ९ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला अक्षता तेंडुलकर या महिलेने तिची सोन्याची चैन चोरीला गेल्याचे म्हटले असल्याने कलम ३९२ जबरी चोरी, विनयभंग केल्याप्रकरणी कलम ३५४ आणि दंगल केल्याप्रकरणी कलम ३४१ गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. माहीम पोलिस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते याना तर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शिवसैनिकांना आणण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी पोलिस चौकशी करत आहेत.
Join Our WhatsApp Communityआंदोलन करुन सर्व जात असताना शिवसेनेच्या नेत्यांनी भ्याड हल्ला केला. तेंडुलकर या महिला पदाधिकारी यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे जर शिवसेना असा हल्ला करणार असेल, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.
-राजेश शिरवडकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष