बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षाशी सूत जुळवत नवीन सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बुधवारी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी, त्यांचे पुत्र आणि तेजस्वी यादव यांचे भाऊ तेजप्रताप यादव हे देखील उपस्थित होते. तेव्हा तापट स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या तेजप्रताप यादव यांनी प्रसारमाध्यमांना अरेरावी केल्याचे पहायला मिळाले.
काय झाले नेमके?
शपथविधी सोहळ्यावेळी आमदार तेजप्रताप यादव हे राजभवनातील दरबार हॉलमध्ये पहिल्या रांगेत बसले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी तिथे गर्दी केली. तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री आणि राबडी देवी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा शीघ्रकोपी तेजप्रताप यादव यांचा पारा चढला आणि ते माध्यमांवर संतापले.
(हेही वाचाः ‘त्यांचं दुःखच वेगळं आहे’, फडणवीसांचा पवारांवर घणाघात)
तेजप्रताप यादवांना संताप अनावर
तेजप्रताप यादव यांचा संताप अनावर झाला होता ते सातत्याने प्रसारमाध्यमांना आरएसएसचे एजंट म्हणून संबोधत होते.
मंचावर शपथविधी सोहळा पार पडत असताना खाली चाललेल्या या गोंधळामुळे राजभवनातील अधिका-यांनी तातडीने धाव घेत प्रसारमाध्यमांना तेथून बाजूला केले, त्यानंतर वातावरण शांत झाले.