मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बायोमेट्रिक हजेरी लागू होणार नाही, अशा हालचाली सुरू असतानाच १९ जानेवारी २०२२ ला सामान्य प्रशासन विभागाने नवे परिपत्रक जारी केले आहे. यामुळे १ जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जावी, असे निर्देश दिले आहेत. १ जानेवारीपासून ही हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदवली जात नसून आस्थापना प्रमुख, खाते प्रमुख, विभाग प्रमुख यांनी त्वरित बायोमेट्रिक मशीन्स कार्यान्वित करून तेथील कर्मचारी बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच उपस्थिती नोंदवित असल्याची खातरजमा करावी, असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही हजेरी सक्तीचीच राहणार आहे.
आरोग्य विभागामुळे विरोध केला
कोविडचा आजार नियंत्रणात येत असल्याने सामान्य प्रशासन विभागाने नोव्हेंबर २०२१ रोजी परिपत्रक जारी करून १ जानेवारी २०२२पासून बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्याचे निर्देश दिले होते. यासाठी त्यांनी प्रत्येक खाते व विभाग यांना बायोमेट्रिक मशिन्स बसवण्याचा सूचना केल्या होत्या. दरम्यान तिसऱ्या लाटेतील वाढत्या रुग्ण संख्येमुळे कामगार संघटनांनी याला तूर्तास स्थगिती देण्याची मागणी केली होती, तर त्यानंतर शासनाने ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्यास स्थगिती दिली होती. त्यामुळे सामान्य प्रशासनाने प्रथम १७ जानेवारी २०२२ पर्यंत आणि त्यानंतर ३१ जानेवारी २०२२ पर्यंत स्थगिती देण्याच्या परिपत्रकाचे दोन मसुदे तयार केले. याला आरोग्य विभागामुळे विरोध झाला. त्यामुळे यावर आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्वाक्षरी केली नाही.
(हेही वाचा अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी मनुष्यबळ तुटपुंजे)
कर्मचारी द्विधा अवस्थेत होते
त्यामुळे महापालिका कर्मचारी द्विधा अवस्थेत अडकले होते. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी नोंदवायची की हजेरी पुस्तकात असा पेच सुरू असतानाच बुधवारी, १९ जानेवारी रोजी परिपत्रक काढून बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित असल्याचे सांगून यावरच हजेरी नोंदवली जावी, अशा सूचना केल्या आहेत. यामध्ये परिपत्रकान्वये कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती यंत्रणा अभियंते, विभाग कार्यालयातील कर्मचारी यामधील जे कर्मचारी पाळी ड्युटीमध्ये कर्तव्यावर नसतील, अशा सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कार्यालयाच्या पूर्व नियोजित वेळेपासून कार्यस्थळी ६० मिनिटांपर्यंत विलंबाने अथवा कार्यालयीन वेळेपूर्वी ६० मिनिटे अगोदर बायोमेट्रीक प्रणालीमध्ये उपस्थिती नोंदविण्याची देण्यात आलेली सवलत ०१.०१.२०२२ पासून रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
नियोजित कर्तव्यकाळ पूर्ण करणे आवश्यक
तसेच यापूर्वी एका महिन्यात केवळ दोन वेळा कार्यालयात १० मिनिटे उशिरा येण्याची मुभा ०१.०१.२०२२ पासून बंद करण्यात येत आहे. पण कार्यस्थळी नियोजित कामकाजाच्या वेळेत येण्यास झालेला विलंब यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या पूर्व नियोजित वेळेपासून कार्यस्थळी उपस्थिती ३० मिनिटांपर्यंत विलंबाने नोंदविण्याची सुविधा कायम राहिल. मात्र कामाची नियोजित वेळ सुरु आल्यापासून जितकी मिनिटे उशिरा येईल, तितकी मिनिटे उशिरापर्यंत थांबून काम करणे आणि आपला नियोजित कर्तव्यकाळ पूर्ण करणे आवश्यक आहे.
जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची
आयुक्तांच्या निर्देशानुसार बायोमेट्रिक मशीन ३१.१२.२०२१ पूर्वी सुस्थितीत कार्यान्वित करण्याची जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची असूनही १ जानेवारी, २०२२ पासून बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाल्यापासून अद्यापही बायोमेट्रिक प्रणालीतून हजेरी नोंदविण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित आस्थापना प्रमुख/खाते प्रमुख/विभाग प्रमुख यांनी त्वरित बायोमेट्रिक मशीन्स कार्यान्वित करून तेथील कर्मचारी बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच उपस्थिती नोंदवित असल्याची खातरजमा करावी, असे निर्देश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community