12 निलंबित आमदारांवर विधीमंडळात सुनावणी झाली, पण…

131

निलंबन प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांच्या सुनावणीला आम्ही सोमवारी १२ आमदारांच्यावतीने उपस्थिती राहिलो. आमचे निवेदन लेखी स्वरुपात आम्ही दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सदर निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग, हेही आम्ही उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असून, हे निलंबन अन्यायकारक असल्याने या विरोधात भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार आणि अन्य ११ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून ती प्रलंबित आहे. त्यावर येत्या दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी अपेक्षित आहे.

( हेही वाचा : कोविड रुग्णांचा पारा उतरला : दिवसभरात सहा हजारांनी घटली संख्या )

दरम्यान, आज या प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानभवनात आपल्या कार्यालयात सुनावणी ठेवली होती. त्याला १२ आमदारांच्यावतीने ६ आमदार उपस्थितीत होते. यामध्ये आमदार अँड. आशिष शेलार, जयकुमार रावल, योगेश सागर, अँड. पराग अळवणी, नारायण कुचे, अभिमन्यू पवार आदींचा समावेश होता.

सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग?

दरम्यान, याबाबत मिडियाला माहिती देताना आमदार अँड. आशिष शेलार म्हणाले की, विधानसभा उपाध्ययक्षांनी आम्हाला सुनावणीसाठी बोलावले होते. सन्मानाने आम्हाला बोलावले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. १२ आमदारांच्यावतीने आम्ही ६ आमदार उपस्थितीत होतो. आमचे कायदेशीर म्हणणे आम्ही लेखी स्वरूपात विधानमंडळ सचिवालयाला आणि उपाध्यक्षांना दिले आहे. आमची कोणतीही चूक नसताना आमच्यावर एक वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यावेळी आमचे म्हणणेही ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो ती याचिका प्रलंबित आहे. त्यावर येत्या दोन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, सदर निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग, हे आम्ही उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.