११ जुलैनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार?

भाजपा आणि शिंदे गटाचे सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर आता या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी, ५ जुलै रोजी शिंदे गटातील सर्व ५० आमदार त्यांच्या त्यांच्या मतदार संघात गेले असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता उणावली आहे. शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा आदेश विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिला होता, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे, त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांच्या नजरा 

शिवसेनेच्या नाराज आमदारांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. महाविकास आघाडीची सत्ता जाताच गेल्या आठवड्यात राजभवन येथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. सरकारने बहुमत चाचणी पूर्ण केली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे नाराज आमदारांसह भाजपाच्या आमदारांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष 

त्यातच आता मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर होईल, अशी माहिती मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका प्रलंबित आहेत, त्यावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी यांची निवड केली, त्याविरोधात शिंदे गटाने याचिका केली आहे. शिवसेनेचे त्यावेळीच प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेने पक्षाची बैठक बोलावून व्हीप काढला होता, तरीही शिंदे गटाचे आमदार बैठकीला आले नाही म्हणून १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची नोटीस उपाध्यक्षांनी दिली, त्यालाही आव्हान दिले. या दोन महत्वाच्या याचिकांवर जो निर्णय होईल, त्यानंतर या नव्या सरकारचे सर्व अडथळे दूर होणार आहेत, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करणे सोयीचे ठरेल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठरवले असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here