राज्यात भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या शिवसेनेकडून, पुन्हा एकदा भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. युतीमधून निवडणूक लढवल्यानंतरही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला बाजूला करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी संधान साधत, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. परंतु महाविकास आघाडीतील कुरबुऱ्या लक्षात घेता, शिवसेनेचे भाजपसोबतचे प्रेम अधूनमधून उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता खुद्द भाजपसोबतची ही मैत्री महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून जपली जात असून, त्यामुळेच एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेना आणि भाजप मागील काही दिवसांमध्ये लसीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आले आहेत.
लसीकरण केंद्रांवर जमले सूत
मुंबईत मागील आठवड्यात कांदिवली पूर्व येथील ग्रोव्हेल्स मॉलमध्ये बनवण्यात आलेल्या वॉक इन ड्राईव्ह लसीकरणानंतर पुन्हा एकदा बोरीवलीतील लसीकरणात शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकत्र दिसून आले आहेत. एरव्ही श्रेयासाठी एकमेकांच्या अंगावर उड्या मारणारे हे पक्ष दोन्ही कार्यक्रमांमध्ये शांततेत सहभागी झाल्याचेही पहायला मिळाले आहे. बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे पार पडले.
(हेही वाचाः महापौरांचा शिवसेनेच्या गडात अपमान! भाजपच्या गडावर मात्र मानसन्मान)
मुंबईच्या प्रथम नागरिक व महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित लसीकरण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाला शिवसेना आमदार विलास पोतनीस, आमदार मनीषा चौधरी, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, आर मध्य व उत्तर समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे, भाजप नगरसेविक जितेंद्र पटेल, जगदीश ओझा, नगरसेविका बीना दोशी आदी मान्यवर नगरसेवक व नगरसेविका तसेच विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे उपस्थित होते.
काँग्रेस राष्ट्रवादीला डावलले
विशेष म्हणजे या लसीकरणाच्या कार्यक्रमाला दोन्ही पक्षांचे आमदार व नगरसेवक, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी कांदिवलीतील ग्रोव्हेल्स मॉलमधील वॉक इन लसीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यातही महापौरांनी हजेरी लावली होती. परंतु भाजपने कोणताही आक्षेप न घेता, महापौरांकडून याचे उद्घाटन करुन घेतले. सलग दोन कार्यक्रमांमध्ये शिवसेना आणि भाजपने हातात हात घालून उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडल्याने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला भाजपशी पंगा घेतला जात असताना, महापौर आणि शिवसेना नेते त्यांच्यासोबत गोडी गुलाबीने वागत आहेत. परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात आहे.
(हेही वाचाः महापौरांकडून आपल्याच समिती अध्यक्षाला कात्रजचा घाट)
महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा
भाजपच्या गडात शिवसेनेने जुळवून घेत कार्यक्रमाचे बार उडवल्याने एकप्रकारे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना हा मोठा धक्का आहे. ज्या खासदार संजय राऊत यांनी भाजपला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, त्याच भाजपला आता महापौर किशोरी पेडणेकर या पुन्हा जवळ घेण्याचा प्रयत्न करत असल्याने, महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा असून, शिवसेनेवर किती विश्वास ठेवावा याचा विचार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला करावा लागणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते भाजपशी शिवसेनेने अशाप्रकारे जुळवून घेण्याचा प्रकार हा वेगळी नांदी आहे. शिवसेनेने भाजपच्या गडात शिरण्यासाठी हा प्रयत्न केला असला, तरी याचे दोन्ही पक्षांचे वर्तन हेच खूप काही सांगून जाते, असेही बोलले जात आहे.
(हेही वाचाः सभागृह नेत्यांबरोबर फाटल्यानंतर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष एकत्र)
Join Our WhatsApp Community