मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी नायर रुग्णालयातील वरळी बीडीडी चाळीतील आग दुघर्टनेतील भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात दिरंगाईबाबतच्या चर्चेत शिवसेना आणि भाजप एकमेकांना भिडले. भाजपच्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या उल्लेखावरून वादाला सुरुवात झाली आणि भाजपच्या या ११ नगरसेवकांनी चक्क स्थायी समिती अध्यक्षांवर चाल करत त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे या गोंधळात १५ मिनिटांकरता सभागृहाचे कामकाज महापौर किशोरी पेडणेकर यांनी तहकूब केले होते.
स्थायी समिती अध्यक्षांकडून तीव्र निषेध
मुंबई महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे नायर रुग्णालयातील रुग्णावर झालेल्या दिरंगाईबाबत सभागृहाचे लक्ष वेधून या घटनेचा तीव्र निषेध केला. याला पाठिंबा देताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करतानाच, भाजपलाही चिमटा काढला. यामध्ये त्यांनी काही लोक आरोग्य समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे देत या प्रकरणाचा शोध घेण्याऐवजी पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
भाजपने तीव्र शब्दात निषेध केला
यशवंत जाधव यांच्या या विधानामुळे भाजप नगरसेवक आक्रमक झाले आणि राजीनामा दिलेल्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी त्यांच्या आसनाकडे धाव घेतली. भाजपच्या नगरसेवकांनी धाव घेतल्यामुळे मग शिवसेनेचेही नगरसेवक जागा सोडून प्रतिकार करायला उभे राहिले. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अगदी हमरी तुमरीपर्यंत हे प्रकरण आले होते. यशवंत जाधव यांनी आपला शब्द मागे घ्यावा, अशी मागणी करताना त्यांच्या या विधानाचा भाजपने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. शिवसेनेचेही नगरसेवक तेवढे आक्रमक झाल्याने काही ज्येष्ठ नगरसेवकांना मध्ये पडून दोन्ही बाजुला कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी लागली.
नायर रुग्णालय प्रशासन, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे ही राजकारण करण्याचे पाप स्थायी समिती अध्यक्षांनी आज पालिका सभागृहात केले.
कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार? pic.twitter.com/bsUFSeRcDX— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 3, 2021
(हेही वाचा मराठी साहित्य संमेलन नव्हे, भुज ‘बळ’ संमेलन!)
सभागृह बंद पाडले
याप्रकरणी बोलतांना भाजपचे प्रवक्ते व नामनिर्देशित नगरसेवक यांनी भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेनेची भूमिका बेताल असून गंभीर विषयावर चर्चा असताना यशवंत जाधव यांनी राजकारण केले. भाजपच्या नगरसेवकांनी रुग्णालयाला दिलेली भेटही त्यांना झोंबली, आरोग्य समितीच्या सदस्यांनी दिलेले राजीनामे त्यांना झोंबले, त्यामुळे त्या रुग्णालयात भाजपचे कुणी फिरकले नसल्याचा त्यांनी दावा केला. त्यामुळे भाजपचे नगरसेवक त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांचा निषेध करण्यासाठी सभागृह बंद पाडले, असे सांगितले.
म्हणून सेना झाली आक्रमक
स्थायी समितीत नायर रुग्णालयातील घटनेचा निषेध म्हणून सभा तहकूब केली. परंतु सभागृहामध्ये जेव्हा हा विषय पुन्हा आला तेव्हा आम्हाला भाजपचा समाचार घेण्याची इच्छाच नव्हती. परंतु भाजपच्या ११ आरोग्य समितीच्या सदस्यांनी जे पत्र महापौरांना दिले, त्यामुळे प्रशासनाचा निषेध करताना त्यांनी महापौर, समिती अध्यक्ष हे तिथे रुग्णाची विचारपूस करायला गेले नाही, असा उल्लेख केला होता. जर प्रशासनाचा निषेध करायचा होता, तर मग महापौरांचा आणि समिती सदस्य गेले नाही, याचा उल्लेख का केला? ही मंडळी तिथे रुग्णांची विचारपूस करायला गेली होती की, शिवसेनेने नगरसेवक तिथे गेले नाही, हे पहायला गेले होते. त्यामुळे भाजप या घटनेवरून राजकारण करत असल्याने त्यांचा आपण समाचार घेतला. मुळात सभागृह नेत्यांनी आधीच दुर्दैवी घटनेवर राजकारण करू नये, असे जाहीर केले होते, पण भाजपने पत्र देवून जे राजकारण केले, त्यामुळे आपल्याला बोलावे लागले, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. भाजपने या घटनेप्रकरणी निश्चित दाद मागावी. आम्हीही त्याच विचाराचे आहोत. पण प्रशासनाचा निषेध करताना आमची नावे का घेता, हाच आमचा प्रश्न आहे.
Join Our WhatsApp Community