भाजपकडून मुक्ता टिळकांच्या कुटुंबाला संधी नाही; चिंचवडमधून लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला उमेदवारी 

152

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. 18 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, आजपर्यंत या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाने प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवण्याची चिन्हे दिसू लागल्याने आज अखेर भाजपाने दोन्ही ठिकाणचे पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर केले.

त्यानुसार, भाजपाकडून कसबा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकसाठी हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीने ही नावे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने आता मविआतून नेमकी कोणती घोषणा होणार, हे पहावे लागेल.

(हेही वाचा कसबा, चिंचवड पोट निवडणुकीत ठाकरे गटाला संधी नाहीच)

महाविकास आघाडीचेही उमेदवार ठरले

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.