भाजपच्या ‘मिशन ४५’ मुळे शिंदे गटातील आजी-माजी खासदार चिंतेत?

82
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्व ४५ जागा निवडून आणण्यासाठी भाजपाने आतापासूनच कंबर कसली आहे. खुद्द भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा मैदानात उतरून विरोधकांवर हल्लाबोल करीत आहेत. मात्र, भाजपच्या या आक्रमक पवित्र्याची विरोधकांपेक्षा शिंदे गटानेच अधिक धास्ती घेतल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेले आणि अटीतटीच्या लढतीत गमवावे लागलेले १८ मतदारसंघ भाजपाने टार्गेट केल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाच्या मतदारसंघातही भाजपाचा वावर वाढलेला दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही भाजपाने आपली ताकद अजमावण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे, शिरूर लोकसभा मतदारसंघात २० जानेवारीला जे.पी. नड्डा यांची भव्य सभा होणार आहे. सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असला, तरी मागच्या पंचवार्षिकचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील तेथून इच्छुक आहेत. त्याच अटीवर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, भाजपा या जागेवर जोर लावत असल्याने ते चिंतेत आहेत. तशी चिंता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवल्याचे कळते.

(हेही वाचा यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला मिळणार का चांगली बातमी?)

खासदारांचे म्हणणे काय?

भाजपा आणि शिंदे गटाने आगामी सर्व निवडणुका युतीमध्ये लढवाव्यात, असे सूत्र ठरले आहे. परंतु, भाजपाचा गेल्या काही दिवसांतला रागरंग पाहता ते राज्यातील सर्व ४५ जागा स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने ‘प्लॅन बी’ आखत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आधीच सावध होऊन लोकसभा निवडणुकीसाठी जागांचा फॉर्म्युला निश्चित करावा, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेतील खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.