सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. शिवसेनेकडून आपले दोन उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर भाजपच्या उमेदवारांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आता भाजपकडून आपल्या दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजपकडून तिस-या जागेबाबत अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.
गोयल, बोंडेंना उमेदवारी
राज्यसभेच्या 57 जागांपैकी महाराष्ट्रातल्या 6 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर विधानसभेत संख्याबळ जास्त असलेल्या भाजपकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आता पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तिसरा उमेदवार देणार?
पण भाजपकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी चर्चा सुरू असतानाच अजूनही तिस-या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण ऐनवेळी भाजपकडून तिस-या नावाची घोषणा करण्यात आली तर ही निवडणूक रंगण्याची चिन्ह वर्तवण्यात येत आहेत.
पियूष गोयल हे सध्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण व वस्त्रोद्योग मंत्री आहेत. तर अनिल बोंडे हे माजी कृषीमंत्री असून राज्यातील भाजपचे मोठे नेते आहेत.
Join Our WhatsApp Community