गेल्या महिन्यात महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतर पक्षांना संपवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपाला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले, ज्यांच्या पक्षाचा जन्मच दुसऱ्या पक्षाला फोडून झालेला असेल, त्यांना भाजपबद्दल बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे शेलार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेलारांनी केला पवारांवर पटलवार
शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांना जुन्या गोष्टींची आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्या पक्षाचा जन्मच दुसऱ्या पक्षांना फोडून झाला, त्यांना दुसऱ्या पक्षांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर टीका केली. नेतृत्वाला संपवण्याचे काम केले आहे. त्यांनी भाजपने कसे वागले पाहिजे, याचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत शेलारांनी पलटवार केला आहे.
(हेही वाचा – पवारांचं दुःख जरा वेगळं; भाजपवरील आरोपांवर फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर)
यासह शेलारांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. सुशील मोदींनी शिवसेनेचा उल्लेख केला असेल तर त्यात चूक काय.. शिवसेना आपापसातील द्वंद्वामुळे फुटली आहे. आमच्यासोबत जर त्यावेळची शिवसेना असती तर अशाप्रकारचे द्वंद्व पाहायला मिळाले नसते. ती सोबत राहिली असती, तर आपापसात द्वंद झाले नसते. आमदार फुटले नसते, असे म्हणत शेलारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
शेलार पुढे असेही म्हणाले की, ही वैचारीक लढाई आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार वाढला पाहीजे, यासाठी त्यांना ही भूमिका का घ्यावी लागली. याबाबत ठाकरेंनी आत्मचिंतन केले पाहीजे. आमच्यावेळी जेव्हा उद्धव ठाकरे होते. त्यावेळी ते एका विचारधारेबरोबर, हिंदुत्वाबरोबर आणि राष्ट्रहिताबरोबर होते. द्वंद्व येण्याची स्थिती उद्धव ठाकरेंनी आणली आहे. बाळासाहेबांच्या विचाराला सांभाळणे आणि वाढवणे तसेच त्याला सन्मान देणे ही भूमिका भाजपाने दिली आहे, असे आशिष शेलार म्हणाले.