भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मंगळवारी शेलार यांनी पत्रकार परिषद घेत असे शिवसेनेसह महाविकास आघाडीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सवाल उपस्थित करत आम्ही शिवसेना हे फाटकं बनियान आहे, असे तुम्हाला म्हणायचे का? असे विचारले. इतकेच नाही तर ते पुढे असेही म्हणाले की, ही बेडूक उड्या मारणारी शिवसेना आहे. शिवसेनेचा देव, देश, धर्म कुठे गेला? असा सवाल करत शिवसेनेचा आजचा कार्यक्रम बघायला गेला तर आयत्या बिळात नागोबा अशी आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
(हेही वाचा – राऊतांच्या घरातून चोरट्यांनी लंपास केला १० लाख रूपयांचा ऐवज!)
काय म्हणाले आशिष शेलार?
सध्या राज्यभरात चाललेल्या भोंग्याच्या वादावरुन राजकारण चांगलंच तापलं असून राजकीय आरोप प्रत्यारोप चालू आहेत. त्यामध्ये बाबरीवरुनही राजकारण सुरु असून बाबरी आम्ही पाडली त्यावेळी शिवेसना कुठे होती, असा सवाल भाजपाकडून उपस्थित केला जात आहे. मिस्टर राऊत तुमचे तोंड काळे होईल, ज्यावेळी विटांचे पूजन केले तेव्हा राऊत तुम्ही कुठे होता. अशी टीका शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
मिस्टर राऊत तुमचे तोंड काळे होईल
पुढे शेलार म्हणाले, आम्ही बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी कुठं होते? ज्यावेळी विटांचे पूजन केले तेव्हा राऊत तुम्ही कुठे होता? जेव्हा गंगा पूजन होत होते तेव्हा तुम्ही कुठे गोधड्या ओल्या करत होता, मिस्टर राऊत तुमचे तोंड काळे होईल, असा टोला त्यांनी शिवसेनेला लावला आहे. तसेच काँग्रेस सरकारचे कमिशन होते तेव्हा शिवसेना राममंदिर या विषयात अदखलपत्र होती, असे म्हणत हिंदुत्वावरून तुम्ही फाटके आहात का? असा सवाल त्यांनी केला आहे.
पवारांच्या रिमोट कंट्रोलवर महाविकास आघाडी
महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्या इशाऱ्यावर चालत असून पवारांच्या रिमोट कंट्रोलवर महाविकास आघाडी सरकार आहे. तसेच, अजित पवारांनी मोदींच्या विरोधात राज ठाकरे सुपारी घेऊन बोलत होते, हे मान्य केले आहे. तर मग त्यांनी आता सुपारीची किंमत किती आहे हे सांगावी. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर ते त्यांना नोटीसा पाठवतात. हे तानाशाहीचे राज्य आहे, वैचारिक स्वातंत्र्य संपले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
- बाळासाहेबांसाठी भाजपने अनुशासन पाळलं
- संजय राऊतांसाठी अनुशासनाची ऐशी की तैशी करू
- बेडुकउड्या मारणारे संजय राऊत शिवसेनेचं नवं नेतृत्व
- शिवसेना फाटकं बनियान आहे