वरळीत पोटनिवडणूक घ्या, मग कळेल, मशाल आहे की चिलीम..!; आशिष शेलार यांची बोचरी टीका

137

अंधेरीच्या निकालानंतर मशाल भडकली, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. पण, त्यांनी वरळीत पोटनिवडणूक घेऊन दाखवावी. मग कळेल, मशाल आहे की चिलीम, अशी बोचरी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

( हेही वाचा : १०९ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, वादग्रस्त पोलीस उपायुक्त अकबर पठाण पुन्हा मुंबईत )

शेलार म्हणाले, माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी. वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची हिमंत दाखवावी. भाजपा कार्यकर्ते आमनेसामने लढून उद्धवजी ठाकरेंच्या सेनेची मशाल आहे, की चिलीम हे दाखवून देतील. जागर मुंबईची दुसरी सभा सोमवारी अंधेरी पूर्व येथे आयोजित करण्यात आली. त्यात शेलार बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मुरजी पटेल, अभिजित सामंत, संजय मोने, महामंत्री संजय उपाध्याय यांसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

मी २५ वर्षे जनतेच्या विश्वासावर निवडून आलेला राजकारणी आहे. या काळात तिकीट द्या म्हणणारे अनेक राजकारणी पाहिले. पण पक्षाने दिलेले तिकीट व्यापक हितासाठी मिळालेले तिकीट परत देणारे मुरजी पटेल हे आगळेवेगळे नेते आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहीजे. पक्षाने सांगितल्यानंतर त्यागासाठी तयार राहण्याची वृत्ती भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे. जागर मुंबईचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काहीजणांच्या पोटात मुरडा सुरू झालाय. विरोधी पक्षाची टोळी मतिमंद झाली आहे. जागर मुंबईचे अभियान केवळ भाजपाला मत द्या, एवढ्यापुरते नाही. कुणा एकाला महापौर बनवायचे आहे, यासाठी देखील हे अभियान नाही. मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी हा जागर आहे, असेही शेलार म्हणाले.

अंधेरीचा निकाल शुभसंकेत

अंधेरी पूर्व विधानसभेचा निकाल नुकताच लागला, तरी अंधेरीत आम्ही सभा घेत आहोत. याचे कारण अंधेरीतील जनतेशी आमचे केवळ निवडणुकीसाठीचे नाते नाही, तर त्यापलीकडचे नाते आहे. अंधेरीचा निकाल शुभसंकेत आहेत. कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपाच्या मदतीशिवाय जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. मुरजी पटेल निवडणुकीला उभे असते, तर उद्धव ठाकरे गटाच्या शाखा बंद करण्याची वेळ आली असती, अशी टीकाही शेलार यांनी केली.

नोटाची मते कॉंग्रेस-राष्ट्रवादीची

  • २०१४ च्या आकडेवारीचा अंदाज घेतला तर असे दिसून येते की, अंधेरीमधील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धवजी ठाकरेंच्या सेनेला मते दिलीच नाहीत.
  • नोटाला अधिक मते मिळाली असल्याबाबत आमच्यावर आरोप केला जातो. हा आरोप खोटा आहे. जर भाजपाने आवाहन केले असते तर १२ ऐवजी ७२ हजार मते नोटाला मिळाली असती.
  • अंधेरी पूर्व येथे ३१ टक्के मतदान झाले. ७० टक्के लोकांनी यांच्या राजकारणाला कंटाळून मतदान केलेले नाही. ही १२ हजार मते नोटाला मिळाली आहेत, ती मते काँग्रेस-राष्ट्रवादीची मते आहेत.
  • मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल, तेव्हा अंधेरी पूर्व विधानसभेतील १० पैकी ८ वॉर्डात भाजपाचा नगरसेवक निवडून आणू, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.