सगळ्यांचे लक्ष लागलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा 3 हजार 716 मतांनी पराभव केला आहे. भगीरथ भालके यांच्या या पराभवानंतर महाविकास आघाडीला आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी असताना भगीरथ भालके यांचा पराभव झाल्याने राष्ट्रावदीचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला, असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अजित दादांची खेळी अपयशी
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. याचमुळे खुद्द अजित दादा पंढरपूर आणि मंगळवेढ्यात तब्बल 5 दिवस तळ ठोकून बसले होते. एवढेच नाही तर दादांनी शिवसेनेच्या शाखेत जाऊन, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असणारा फोटो देखील यावेळी व्हायरल झाला होता. मात्र इतके करुनही दादांची खेळी अपयशी ठरली, असेच म्हणावे लागेल.
पंढरपुर पोट निवडणुकीमधे MVA मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले..
— nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2021
तरीही लोकानी नाकारले..
MVA मधल्या आमदारांना हा संदेश आहे..
येणारा धोका समजा आणि..
एक पाउल पुढे टाका..
भा ज प हा एकच पर्याय आहे..
महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!
(हेही वाचाः पंढरपूरचा पांडुरंग कुणाला पावणार?)
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराने चित्र बदलले
सहानुभूतीची लाट आणि अजित दादांची व्यूहरचना यामुळे या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके विजयी होतील, असे चित्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत होते. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एक दिवसाच्या दौऱ्यामुळे पुन्हा भाजपने आघाडी घेतली. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाणीप्रश्नाबाबत वडील भारत भालके यांनी 3 निवडणूक जिंकूनही हा प्रश्न सुटला नव्हता. तोच प्रश्न फडणवीस यांनी कळीचा बनवला आणि भाजपच्या बाजूने मतांचे पारडे झुकवले.
पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला. भाजपाचे समाधान आवताडे विजयी. भकास आघाडीच्या भालकेना धूळ चारली. आमचे नेते @Dev_Fadnavis आणि तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 2, 2021
अशी होती मतदारसंघाची पार्श्वभूमी
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. त्यात 1 लाख 43 हजार 746 महिला तर 1 लाख 59 हजार 167 पुरुष मतदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांना 89 हजार 87 मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76, 426 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना 54 हजार 124 मते मिळाली होती. काँग्रेसच्या शिवाजी काळुंगे यांना 7 हजार 232 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या भारत भालके यांचा या निवडणुकीत अवघ्या 13 हजार 361 मतांनी विजय झाला होता. मात्र, आता समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा 3 हजार 716 मतांनी पराभव करत, आपल्या पराभवाची परतफेड केली आहे.
Join Our WhatsApp Community