उत्तर भारतीयांमुळे होणार मनसेचा घात?

दिल्लीच्या बैठकीत मनसे युतीवर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी रस दाखवला नाही.

105

मनसे-भाजप एकत्र येणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर कृष्णकुंजवर जात, तसे संकेतच दिले होते. मात्र खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे केंद्रातील नेते भाजप-मनसे युतीच्या चर्चेमुळे प्रचंड नाराज आहेत. भाजप-मनसे युतीच्या चर्चा विनाकारण कशाला, असा सवालच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना विचारला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते सध्या दिल्लीत असून, दिल्लीत जोरबैठका सुरू आहेत. मात्र दिल्लीच्या बैठकीत मनसे युतीवर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात केंद्रातील नेत्यांनी रस दाखवला नाही.

म्हणून नको मनसेसोबत युती?

२०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पार पडणार असून, या निवडणुकीकडे सध्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. भाजपला युपीमध्ये आपली सत्ता कायम ठेवायची आहे. याचमुळे मनसेला सोबत घेण्यास केंद्रीय नेतृत्वाला रस नसल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल केलेली भाषणे यामुळे आजही उत्तर भारतीय त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर नाराज आहे. याचमुळे मनसेला सोबत घेण्यास भाजपचे केंद्रीय नेतृत्व तयार नसल्याचे कळते.

(हेही वाचाः म्हणून भाजपच्या मनात ‘मन’से!)

‘लाव रे तो व्हिडिओ’नेही मोदी-शहा नाराज?

मनसेला सोबत न घेण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घेतलेली भूमिका. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे देखील हे दोन्ही नेते प्रचंड दुखावले आहेत. याचमुळे मनसेला सोबत घेण्यास सध्या तरी अमित शहा आणि मोदींचा विरोध असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

चंद्रकांत पाटलांच्या त्या भेटीवर नाराज?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली होती. या भेटीमुळे देखील अमित शहा हे चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. युपी निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप युतीच्या चर्चा योग्य नसल्याचे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे मत आहे.

(हेही वाचाः शिवसेनेचे ‘संजय’ राष्ट्रवादीला बुडवणार!)

म्हणून भाजपसाठी उत्तर प्रदेश महत्त्वाचे

भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या राज्यातून तब्बल ८० लोकसभा खासदार निवडून जातात. आज देशातले सर्वात मोठे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, ज्याची लोकसंख्या सुमारे २२ कोटी आहे. याआधी म्हणजे मार्च २०१७च्या विधानसभा निवडणुका भाजपने दणक्यात जिंकल्या होत्या. त्यामुळे आताही भाजपला तिथे पुन्हा सत्ता टिकवायची आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.