भाजपच्या जितेन गजारियानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंना राबडी देवी असं संबोधले होते. त्याच विधानाला आता चंद्रकांत पाटलांनी पाठिंबा देऊन त्याने केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. चंद्रकांत पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलताना असे म्हणाले की, महिलांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारची प्रवृत्तीही माझा तो बळवंतराव दुसऱ्याचा तो बाब्या अशी आहे. पंतप्रधानांना काही म्हटलं तरी चालतं, मात्र भाजपच्या सोशल मीडियाच्या जितेन गजारिया यांच्या विरोधात मात्र यांनी वॉरंट काढलं. बरं काय म्हणाला तो राबडी देवी, ही काय शिवी आहे का? तो फुलन देवी नाही म्हणाला, असेही ते म्हणाले.
Marathi Rabri Devi pic.twitter.com/P1rnO0SC9o
— Jiten Gajaria (@jitengajaria) January 4, 2022
राबडीदेवी म्हटलं यात काहीच गैर
“जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडीदेवी म्हटलं यात काहीच गैर नाही. लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी राज्य सांभाळलं होतं. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे रश्मी ठाकरे या देखील राबडीदेवी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळू शकतात, त्यामुळे राबडीदेवी म्हणून गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली, फूलनदेवी म्हटलेलं नाही, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, याप्रकरणी आम्ही त्यांना समज दिली आहे. भाजपाची महिलांबद्दल योग्य शब्दांत बोलण्याची संस्कृती आहे,” असेही पाटील म्हणाले.
(हेही वाचा -जिम, ब्युटी पार्लरला जाताय? वाचा ठाकरे सरकारचा सुधारित आदेश)
गजारिया भाजपचे सोशल मीडिया प्रभारी
जितेन गजारीया याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ताब्यात घेतलं आहे. जितेन गजारीया यानं रश्मी ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलही ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. जितेन गजारिया हे भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला होता. आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी जितेन गजारिया यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतही आक्षेपार्ह लिखान केलं होतं. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं नोटीस बजावली होती.
Join Our WhatsApp Community