‘मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला’, चंद्रकांतदादांचा नाना पटोलेंना इशारा

133

पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

राजकीय आयुष्यात पटोलेंची नौटंकी

नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नाना पटोलेंच्या राजकीय आयुष्यात नौटंकीचे अनेक प्रसंग आहेत. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे.

पटोलेंनी तुलना करताना विसरू नये

ते म्हणाले की, नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेची तूलना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्याशी करणे हास्यास्पद आहे. राहुल गांधी अमेठीमध्ये लोकसभा निवडणूक हारलेले आहेत तर प्रियंका गांधी अद्याप एकाही निवडणुकीत विजयी झालेल्या नाहीत. त्यांच्या सुरक्षेची तूलना देशातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेशी करणे असा प्रकार नाना पटोलेच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान असून ते जागतिक नेते आहेत, हे पटोले यांनी तुलना करताना विसरू नये.

(हेही वाचा –तुमचा डॉक्टर पॉझिटिव्ह तर नाही ना! आतपर्यंत राज्यात २९१ निवासी डॉक्टरांना कोरोना)

काँग्रेसच्या धमक्यांना भाजप घाबरत नाही

त्यांनी सांगितले की, नाना पटोले यांनी पंतप्रधानांविषयी आज घडलेल्या घटनेबाबत बोलताना राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याची आठवण करून दिली आहे. अशी आठवण करून देऊन नाना पटोले यांना धमकी द्यायची आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. आज मोदीजींच्या गाडीवर हल्ला होण्यासाठी पटोले यांच्या पक्षाच्या सरकारने ढिसाळपणा केला का, हे सुद्धा त्यांनी सांगावे. ते म्हणाले की, पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती त्याचा उल्लेख नाना पटोले यांनी बलिदान असे म्हणत आज केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या जीवघेण्या ढिसाळपणामुळे आज निर्माण झालेल्या परिस्थितीत इंदिराजींच्या हत्येचा उल्लेख करून नाना पटोले यांना काय सुचवायचे आहे, हे ही त्यांनी सांगावे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या धमक्यांना भाजप घाबरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचे आशिर्वाद मिळालेले आहेत आणि त्या आशिर्वादांचे भक्कम कवच त्यांच्याभोवती आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी ठणकावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.