राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत असल्याची खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आले की त्याची सुटका होत नाही, असे वादग्रस्त विधान बावनकुळे यांनी केले आहे. साताऱ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत यायची स्वप्न पाहू नयेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे. पवारांनी केलेल्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासारखा विचार करू लागला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – दणक्यात आणलेली 21 लाखाची बाईक, 15 मिनिटात डोळ्यांसमोर जळून झाली खाक!)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांची साताऱ्यातच पत्रकार परिषद होती तेथे बोलताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर कठोर शब्दात टीका केली. यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न बघणं सोडून दिले पाहिजे. बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न अडीच वर्षापूर्वी केला होता. उद्धव ठाकरेंवर एक प्रकारे जादूटोणा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि कोणताच विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. हा जादूटोणा राष्ट्रवादीने केला मात्र आता आम्ही सतर्क झालो आहोत.
दरम्यान, जादूटोणा करणारे भोंदूबाबा कोण असे बावनकुळेंना विचारणा करण्यात आली यावेळी ते म्हणाले, हे भोंदूबाबा कोण हे संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे.