एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल, तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने विरोधही करता येईल. पण चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणाऱ्यांची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला.
( हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण; नव्या समीकरणांची नांदी? )
ते म्हणाले की, काँग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची यात्रा राज्यात आली असताना काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. काँग्रेसच्या १२०० कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सातारा येथे भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे तीन नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले. राहुल गांधी यांची यात्रा काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या मुलांनी ताब्यात घेतली आहे. काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना यात्रेचा गंधही नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरे झाले कॉंग्रेसचे
शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेसाठी आयुष्य देणारा निष्ठावान कार्यकर्ता सोडून जातो तरीही उद्धव ठाकरे यांना काही फरक पडत नाही. कारण त्यांच्या पाठीशी आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मध्य प्रदेशला मिळाला आहे, याविषयी विचारले असता, हा प्रकल्प मिळण्यासाठी जून महिन्यात केंद्र सरकारला एक निर्दोष प्रस्ताव सादर करायचा होता. पण त्यावेळी सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीने ते काम केले नाही. त्यामुळे हा प्रकल्प गमावण्यासही महाविकास आघाडीच दोषी आहे. त्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारला दोष देता येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
Join Our WhatsApp Community