मुंबईतील पत्रा चाळीतील सहाशेजणांच्या तक्रारीवरून खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली आहे. मराठी माणसांची फसवणूक करून बँक खात्यात कोट्यावधी रुपये येत असतील तर त्या संदर्भात चौकशी होणारच. यात काही गडबड नसेल, तुम्ही पैसे घेतले नसतील, तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होईल. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? आता अकांडतांडव करून उपयोग नाही, असे वक्तव्य भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आपल्याकडे लोकशाही आहे, देश कायद्याने चालतो
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, खासदार संजय राऊत यांची चौकशी अचानक झालेली नाही. पत्रा चाळ प्रकरण आज काढलेले नाही. पत्रा चाळीतील सहाशे मराठी कुटुंबांच्या घराचा प्रश्न आहे. ते लोक रस्त्यावर आले आहेत. त्या मराठी माणसांनी केलेल्या तक्रारीवरून कारवाई झाली आहे. लोकांची घरे खाऊन कोट्यवधी रुपये नेत्यांच्या बँक खात्यात गेले आहेत. ही तक्रार बावनकुळे, फडणवीस यांनी ईडीकडे केलेली नाही. ईडीकडून त्यांना चारवेळा नोटीस गेली होती; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ईडीच्या अधिकार्यांना हेलपाटे मारायला लावले. आता घरी आल्यावर अकांडतांडव कशाला ? आपल्याकडे लोकशाही आहे, देश कायद्याने चालतो. गडबड केल्याशिवाय कोणी अटक करत नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक यांनीही सुरवातीला आपण काही केले नाही, असेच म्हटले होते. त्याप्रमाणेच कारवाई झाल्यानंतर राऊत स्वतःला हिरो असल्यासारखे दाखवत आपण काही केले नसल्याचे सांगत आहेत.
… त्यामध्ये भाजपचा संबंध नाही
भाजपवर होत असलेल्या आरोपांवर बोलताना बावनकुळे म्हणाले, पत्रा चाळीतील सहाशे लोकांचे अर्ज आल्यानंतरच कारवाई झाली. त्यामध्ये भाजपचा संबंध नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी न्यायालयाने लावली. त्यात भाजप कुठे आले ? राऊत यांच्या अटकेनंतर महाराष्ट्र तुटतोय, महाराष्ट्रावर अन्याय होतोय, असे ओरडण्यात अर्थ नाही. हे प्रकरण न्यायालयात जाईल. योग्य काय ते न्यायालय ठरवेल. आधी चार्जशीट बघा, त्यामध्ये कोणते गुन्हे दाखल केले आहेत ते पाहा. काहीच केले नसेल तर महाराष्ट्र जयजयकार करेल, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशावर ‘शिंदेंचं नाव’, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…)
सरकारमध्ये राहून पैसे खायचे कामच या लोकांनी केले. भाजप सरकार आले आणि त्या प्रकरणांची चौकशी झाली तर त्यात गैर काय आहे ? आमची सत्ता होती तेव्हा मी राज्यात ऊर्जामंत्री होतो. आम्ही काही चुकीचे केले असेल तर चौकशी करा, असे आव्हान आम्ही दिले होते; पण महाविकास आघाडी सरकार काहीच करू शकले नाही. फक्त विरोधकांवरच ईडीची कारवाई होते, या आरोपांचे बावनकुळे यांनी खंडन केले.
Join Our WhatsApp Community