राज्य महिला आयोगाचे पद अजून रिक्त आहे. ते भरण्यात यावे, अशी मागणी भाजपाकडून वारंवार होत आहे. अशा वेळी जेव्हा या पदासाठी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित झाले, त्यावर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावर धक्कादायक ट्विट केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा शब्दांत त्यांनी चाकणकर यांचे नाव न घेता टीका केली.
काय म्हटले चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित झाले आहे. त्याची अधिकृत घोषणा गुरुवारी, १४ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्या आधीच चित्रा वाघ यांनी त्यावर जहरी टीका केली. ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल’, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे
अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका
अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 14, 2021
(हेही वाचा : राष्ट्रपिता ही संकल्पनाच अमान्य! रणजीत सावरकरांचा घणाघात)
दोन वर्षे पद रिक्त
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. गेले दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होते. वाढत्या महिला अत्याचारांवरुन विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे लवकरच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आघाडीतील महिला नेत्याची वर्णी लागणार, अशी चर्चा होती.
Join Our WhatsApp Community