रक्षकांनाच भक्षक बनवणारं सरकार! चित्रा वाघ यांचा घणाघात

73

ठाकरे सरकारवर सातत्याने विरोधकाकडून कोणत्या न कोणत्या कारणांवरून टीका केली जात आहे. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र पाठवले आहे. हे पत्र सुमन काळे प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना पाठवून चिंतन करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. यावेळी रक्षकांनाच भक्षक बनवणारे आणि गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवणारे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे का ?? हा प्रश्न सुमन काळे यांना न मिळणाऱ्या न्यायामुळे उभा ठाकतोय असेही त्यांनी म्हणत राज्य सरकारवर घाणाघात केलाय.

जेव्हा प्रस्थापितांचं सरकार सत्तेत येतं तेव्हा…

“जुलमी क्रिमीनल ट्राईब अॅक्ट संपवून पन्नास वर्षे झाली तरी आजही अनेक भटक्या जाती-जमातींकडे पोलीस यंत्रणेचा व त्यांचा वापर करणाऱ्या प्रस्थापितांचा पाहण्याचा दृष्टीकोन मात्र गुन्हेगाराचाच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना देऊन सर्वच घटकांना सामाजिक न्याय मिळण्याची तरतूद करून ठेवली. परंतु सर्व यंत्रणा हातात ठेऊन, तिला वाकवण्याची मिजास अनेक प्रस्थापित करत असतात. म्हणूनच की काय जेव्हा जेव्हा प्रस्थापितांचं सरकार सत्तेत येतं तेव्हा तेव्हा येथील दुर्बल घटकांवर अत्याचार होतात, ही बाब काही लपून राहिलेली नाही,” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

‘राज्याचे गृहमंत्री म्हणून आत्मचिंतन कराल’

“इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात सर्वात प्रथम येथील आदिवासी, भटक्या जाती-जमातींनी बंड पुकारले. बिरसा मुंडा ते थोर नरवीर उमाजीराजे नाईक अशा क्रांतीवीरांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले. म्हणूनच इंग्रजांनी अत्यंत जुलमी कायदा आणून या जाती-जमातींवर गुन्हेगारीचा शिक्का मारला,” असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. “प्रस्थापितांकडून अन्याय होत असेल तर समाजातील सर्वात शेवटच्या घटकाची आशा पोलीस यंत्रणेवर असते. पंरतु रक्षकांनाच भक्षक बनवणारे आणि गुन्हेगारांचंच नैतिक बळ वाढवणारे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे का? हा प्रश्न सुमन काळे यांना न मिळणाऱ्या न्यायामुळे उभा टाकतोय. याचे आत्मचिंतन आपण राज्याचे गृहमंत्री म्हणून कराल,” अशी अपेक्षा वाघ यांनी पत्राद्वारे केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.