राज्यातील नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आज, मंगळवारी राजभवनात पार पडला असून पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. संजय राठोडांच्या शपथविधीनंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी पहिले ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर टीका केल्याचे दिसत आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ
आमदार संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्याला लागला. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. यावरून चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले की, राठोड यांनी मंत्रिपद देणं हे योग्य नसून अत्यंत दुर्दैवी आहे.
(हेही वाचा – शहाजी पाटलांना मिळणार मंत्रिपद? बापू स्वतः म्हणाले, ‘आमचं गुवाहाटीतच ठरलंय की…’)
“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणा-या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाले असले तरीही त्यांच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे” ,असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
काय आहे प्रकरण
बीडमधील परळीतील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरूणीने आत्महत्या केली होती. तिने पुण्यात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान, पूजा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना परत मंत्रिपद मिळालं आहे. पण त्यांच्याविरूद्धचा माझा लढा अजूनही कायम राहील असा पवित्रा भाजपच्या चित्रा वाघ यांनी घेतला आहे.