भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या सातत्याने महिलांविरोधातील अत्याचारांवर आवाज उठवत असतात. नुकताच त्यांनी आता मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थितीत करत थेट केंद्र सरकारला जाब विचारला आहे. दरम्यान, त्यांनी यासंदर्भात ट्वीट करून रेल्वे मंत्रालयाला चौकशी करावी, असे सुचविले आहे. रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना टॅग करुन केलेल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – होमग्राऊंडवर येताच निवडणुकांबाबत फडणवीसांचं मोठं भाकित! म्हणाले…)
काय आहे ट्वीट?
महिला मुलींवरचे वाढते हल्ले पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा उपयोग काय आहे. महिला रेल्वे डब्यात पोलिस का नाहीयेत याचे रेल्वे मंत्रालयाने उत्तर द्यावे. कित्येक वेळा महिला मुलींवर हल्ले झालेत बऱ्याचजणींना जीव गमवावे लागलेत, त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना केले आहे.
महिला मुलींवरचे वाढते हल्ले पहातां त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा उपयोग काय @Central_Railway का नाहीयेत पोलिस महिला डब्यात उत्तर द्या..
कित्येक वेळा महिला मुलींवर हल्ले झालेत बर्याचजणींना जीव गमवावे लागलेत..@raosahebdanve याची चौकशी व्हावी https://t.co/0d8HH10QlZ— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 16, 2022
महिला डब्यात पोलीस नसणारा व्हिडिओ व्हायरल
मुंबईत रात्रीच्यावेळी लोकलनं प्रवास करताना महिला डब्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असणं बंधनकारक आहे. पण रात्री १० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित नसल्याची तक्रार करणारा एक व्हिडिओ महिला प्रवाशानं पोस्ट करत यासंदर्भात सोशल मीडियावरुन महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून चर्चेत आहे. अनेक महिलांनी चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच अनेकांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मध्य रेल्वेने अधिक सतर्क राहण्याची आणि जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही सांगितले आहे.