नगरसेवक हरीश भांदिर्गे यांना अटक होणार?

अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्याला फोनवर धमक्या दिल्या, तर संपूर्ण यंत्रणा पंगू होईल आणि हा ट्रेंड वाढतच जाईल, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

70

मुंबई महापालिकेचे भाजपाचे नगरसेवक हरीश कृष्णा भांदिर्गे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे नगरसेवक भांदिर्गे यांना अटक होण्याची शक्यता आहे. भांदिर्गे यांनी महापालिकेच्या जल विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…तर हा ट्रेंड बनेल!

या प्रकरणी युक्तीवाद करताना वस्तुस्थिती जाणून न घेता आरोपीने सरकारी कर्मचाऱ्याला धमकी दिली, तसेच शिवीगाळही केली. आरोपीने सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य करण्यापासून अडविले आणि त्याचा अवमान केला आहे. अशा परिस्थितीत आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला, तर ते तपासाला सहकार्य करणार नाहीत, अशी शक्यता सरकारी वकिलाने यावेळी व्यक्त केली. तर त्यावर न्यायालयाने यावर कडक शब्दांत भाष्य केले. सरकारी कर्मचारी त्याचे कर्तव्य बजावत असताना नगरसेवकांना शिवीगाळ करणे, धमकावणे आणि मारहाण करणे योग्य नाही. अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्याला फोनवर धमक्या दिल्या, तर संपूर्ण यंत्रणा पंगू होईल आणि हा ट्रेंड वाढतच जाईल. जर याकडे दुर्लक्ष करून अटकपूर्व जामीन मंजूर केला, तर कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना चुकीचा संदेश जाईल, नगरसेवकाकडून दबाव यायला लागला तर पालिका आणि सरकारी यंत्रणा खिळखिळी होईल, असे न्या. एम.जी. देशपांडे यांनी नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना म्हटले.

(हेही वाचा : ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राजभवनात का अडकणार? जाणून घ्या)

काय आहे प्रकरण?

महापालिकेच्या जल विभागाच्या सहायक अभियंत्याने केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना त्यांच्या पथकासह घाटकोपर (पश्चिम) येथील शर्मा शाळेला भेट देण्यास सांगितले आणि तेथील पाणी सुरू असलेले बंद करण्यास सांगितले. याचा उद्देश हाच होता की तेथील वृंदावन सोसायटीला पाणी मिळावे. मात्र याबाबत खातरजमा न करता हरीश भांदिर्गे यांनी अभियंत्याला फोन करून शिवीगाळ केली आणि धमकी दिली. त्यांच्या या कृत्यामुळे अभियंत्याने पोलिसांत तक्रार केली. त्यावर अटकेच्या भीतीने हरीश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.