‘राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते’, ओळखा पाहू कोण? भाजपचा जनतेला सवाल

116

राणी बागेतील पेंग्विन आणि वाघांच्या इंग्रजी नावांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी सुरूये. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यापाठोपाठ आता भाजपच्या स्थायी समितीच्या सदस्या राजश्री शिरवाडकर यांनी या इंग्रजी नावावरून महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. महापौरांनी पेंग्विनची इंग्रजी नावं ठेवली यावरून विरोधकांनी महापौरांसह ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. यानंतर महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आणि त्यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांचा रोख चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यावर होता. त्या म्हणाल्या पुढच्या वेळी हत्तीच्या पिलाला चंपा, तर माकडाच्या पिलाचे नाव चिवा ठेवू. यानंतर आता भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही पेडणेकरांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले आहे.

ओळखा पाहू कोण ? म्हणत जनतेला सवाल

मराठीच्या पाट्यावरून वाद सुरू असतानाच राणीच्या बागेतील प्राण्यांची इंग्रजी नावे ठेवण्यात आली आहे. यावरून राजश्री शिरवाडकर यांनी थेट महापौरांवरच निशाणा साधला. दरम्यान, मुंबईत सुरू झालेल्या नेत्यांच्या राजकारीय वादात आता भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही उडी घेतली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत त्यांनी एक ट्विट केले आहे. “ओळखा पाहू कोण ??? असे म्हणत, राणीच्या बागेत नांदते, हत्ती सारखी डुलते, ठेकेदाराच्या कुरणावर चरते, कुरण न दिल्यास डिवते आणि अख्खी फाईलच गिळते,” असे शिरवाडकर यांनी खोचकपणे म्हटले असून जनतेलाच विचारणा केली आहे.

‘ही कसली मराठी अस्मिता’

मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश महापौर आत्यांनीच केराच्या टोपलीत टाकला. एका प्राण्याचं नाव ऑस्कर ठेवलं ही कसली मराठी अस्मिता. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश नाही तर फतवा काढला. पण त्यांच्या महापौर आत्यांनीच पेंग्विनची नाव इंग्रजी ठेवलीत, अशी खोचक टीका शिरवाडकर यांनी केली. राणी बाग मुंबईत आहे की लंडनला? मराठीच्या नावावर मत मागणाऱ्या शिवसेनेच हेच मराठी प्रेम आहे का?, असा सवाल भाजपच्या स्थायी समिती सदस्य राजेश्री शिरवडकर यांनी महापौरांना केला आहे.

चित्रा वाघ यांचा महापौरांना टोला

भायखळा येथील राणी बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाला ‘ऑस्कर’ नाव दिल्यावरून, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून एक फोटो शेअर करत मराठी नाव नसल्यावरून टोला लगावला होता. यावर महापौरांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.