सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपचे ‘जागो आयुक्त प्यारे’ आंदोलन

भ्रष्टाचाराला आळा, पायबंद घालण्यासाठी आणि सामान्य करदात्या मुंबईकरांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचारी स्थायी समिती अध्यक्षांवर कठोर कारवाई करा.

69

मुंबई महापालिका स्थायी समितीत शेवटच्या सभेत शिवसेनेने ६ हजार कोटींचे ३८९ प्रस्तावांबाबत कोणत्याही चर्चेविना, विरोधकांना बोलू न देता निर्णय घेतल्याने भाजपच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. सत्ताधारी पक्षाकडून न्याय मिळत नसल्याने भाजपच्या नगरसेवकांनी ‘जागो आयुक्त प्यारे’, ‘भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा’, अशा घोषणा केल्या. स्थायी समिती अध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल तपासणी करून या भ्रष्टाचाराला आळा, पायबंद घालण्यासाठी आणि सामान्य करदात्या मुंबईकरांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचारी स्थायी समिती अध्यक्षांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत केली.

भाजपची तीव्र निदर्शने

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी समितीच्या बैठकीत भाजपच्या गटनेत्यांना हरकतीचा मुद्दाही उपस्थित करू न देता, तसेच कोणत्याही प्रस्तावांवर चर्चा करू न देता मंजूर केलेल्या प्रस्तावांमुळे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पक्षाच्या नगरसेवकांसमवेत आयुक्तांच्या दालनाबाहेर तीव्र निदर्शने केली. यावेळी, ‘भ्रष्टाचाराला आळा घाला’, ‘करदात्या मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी थांबवा’, ‘मुंबईकरांना सुसह्य जीवन द्या’, ‘यशवंत जाधवांवर कारवाई करा’ अशा जोरदार घोषणा देत महापालिका मुख्यालय दणाणून सोडले.

(हेही वाचाः स्थायी समितीच्या शेवटच्या सभेत गोंधळात गोंधळ: हजारो कोटींचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर)

भ्रष्टाचाराला आळा घाला

स्थायी समितीत आलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या, त्यात स्पष्टता नव्हती. याबाबत कुठलीही चर्चा करण्यास अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. काही प्रस्ताव आदल्या रात्री आले होते, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे. त्यामुळे असे प्रस्ताव मंजूर न करता आयुक्तांनी एक जबाबदार प्रशासक म्हणून पालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी आयुक्तांच्या अनुपस्थितीमध्ये अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले.

WhatsApp Image 2022 03 07 at 8.54.39 PM

लोकशाहीचा गळा घोटत प्रस्तावांना मंजुरी

सत्ताधारी शिवसेनेने सर्वसामान्य मुंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार पहायला मिळत आहे. देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडत नसेल, इतकी भयावह परिस्थिती आज पालिकेत पहायला मिळते. आयुक्तांना हाताशी धरून पालिकेत प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याइतपत शिवसेनेची मजल गेली आहे. स्थायी समितीत आलेले अनेक प्रस्ताव आदल्या रात्री आले होते. परंतु स्थायी समिती अध्यक्षांनी दादागिरीने महापालिका नियम पायदळी तुडवत लोकशाहीचा गळा घोटत, रेटून सर्व प्रस्ताव मंजूर केले.

(हेही वाचाः संयुक्त महाराष्ट्र कलादालनाच्या शेजारी आग)

जनता धडा शिकवेल

केवळ कंत्राटदारांच्या दलालीसाठी केलेले स्थायी समिती अध्यक्षांचे हे वर्तन लोकशाहीला काळीमा फासणारे आहे, अशी घणाघाती टीका गटनेते शिंदे यांनी केली. गेली तीस वर्षे मुंबईकरांना खोटी आश्वासने देऊन फसवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला आगामी निवडणुकीत जनताच धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देत भाजप गटनेते शिंदे यांनी दंड थोपटत शिवसेनेला आव्हान दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.