मुंबई महापालिकेची स्थायी समिती वगळता इतर वैधानिक समित्यांसह महापालिकेच्या सभा आजही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जात आहेत. एका बाजूला कोविडचे निर्बंध शिथिल होऊन सर्व व्यवहार सुरळीत झाले असून, बैठका व सभेचे कामकाज केले जात आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या सभा आणि बैठका या व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे घेतल्या जात आहेत.
त्यामुळे कुठेतरी भ्रष्टाचाराची चर्चा आणि आरोप विरोधकांकडून होऊ शकण्याची भीती सत्ताधारी पक्षाला असल्यामुळे ते प्रत्यक्ष सहभाग घ्यायला नकार देत आहेत. त्यामुळेच सर्व प्रकारचे दरवाजे ठोठावल्यानंतर याबाबतचे परिपत्रक रद्द करून प्रत्यक्ष सभा घेण्याचे परिपत्रक जारी करण्याबाबत भाजप नगरसेवकांचे शिष्टमंडळ आता राज्याच्या प्रधान सचिवांची भेट घेणार आहेत.
(हेही वाचाः कोरोना काळातील महापालिका रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांना लागली लॉटरी! किती मिळणार रक्कम?)
राज्याच्या सचिवांना पत्र
मुंबई महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे आणि पक्षनेते विनोद मिश्रा यांनी राज्याच्या सचिवांना पत्र लिहून भाजपच्या स्थायी समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची विनंती केली आहे. भाजपने या पत्रामध्ये मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे, लोकल प्रवासासही मुभा मिळालेली आहे. मुंबईतील शाळाही आता प्रत्यक्ष सुरु झालेल्या आहेत. मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष सभा अद्यापही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असल्याच्या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सभेत येतात अडचणी
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलला, हे ऐकू येत नाही. तसेच प्रतिध्वनी ऐकू येतो. तसेच नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. कित्येक प्रस्तावांवर बोलण्याची संधीही मिळत नाही. त्यामुळे आता सर्व बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्ष घेणे आवश्यक आहे. या बाबी संदर्भात भाजपा स्थायी समिती सदस्यांचे शिष्टमंडळ आपणांस भेटू इच्छिते, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘बेस्ट’ झाले! तिसऱ्या लाटेत बाधित झालेले २५० कर्मचारी कोरोनामुक्त)
Join Our WhatsApp Community