भाजप नगरसेवकांकडून नालेसफाईची पोलखोल! 

संपूर्ण मुंबईत भाजपचे ८६ नगरसेवक असून त्यातील २८ नगरसेवकांच्या विभागांमधील नाल्यांची सफाई झालेली नाही. यामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची भीती या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

153

मुंबईत १०७ टक्के नालेसफाईचा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केल्यानंतर तो पहिल्याच पावसात फोल ठरला. त्यानंतर आता भाजपनेही नालेसफाई न झालेल्या नाल्यांची यादीच प्रदर्शित करत मुंबईतील सत्ताधारी पक्षाचा आणि प्रशासनाचा दावा खोटा ठरवला आहे. भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांकडून विभागातील न झालेल्या नाल्यांची माहिती मागवली आहे. त्यामध्ये भाजपच्या २८ नगरसेवकांनी आपल्या विभागांत नाल्यांची सफाई झालीच नसल्याचा अहवाल पक्षाला सादर केला असून त्यानुसार भाजपने ही जंत्रीच प्रशासनाससह महापौरांना सादर करत याची सफाई त्वरीत करावी. भाजपचे नगरसेवक आपल्याला सहकार्य करण्यास पूर्ण तयार असल्याचे आश्वासनही दिले आहे.

नालेसफाईबाबतची सत्यस्थिती निदर्शनास आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबई शहरातील अद्याप साफ न झालेल्या नाल्यांची तसेच त्यामुळे प्रशासकीय, प्रभावित पूरप्रवण क्षेत्राची यादी देत दावे प्रतिदावे बाजूला ठेवून शहरातील अपूर्ण नालेसफाई तातडीने पूर्ण करावी.
– प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप महापालिका

महापालिकेचा दावा फोल!

महापालिकेकडून जरी नालेसफाई १०७ टक्के केली असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नालेसफाई झाल्याचे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात संपूर्णत: ‘मुंबईची तुंबई’ झाल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत घरी जावे लागले होते, तर अनेकांच्या घरात शिरलेले पावसाचे पाणी आठ – दहा तासांनंतरही ओसरले नव्हते. पण त्यापूर्वीच भाजपने ईशान्य मुंबई तसेच पूर्व उपनगरातील नाल्यांची पाहणी करून नालेसफाईच्या कामाचा पर्दाफाश केला होता.

(हेही वाचा : बोरीवलीतील ‘त्या’ पुलाचे काम आता अजून रखडण्याची शक्यता)

भाजपच्या २८ नगरसेवकांच्या विभागातील नाले अस्वच्छ! 

संपूर्ण मुंबईत भाजपचे ८६ नगरसेवक असून त्यातील २८ नगरसेवकांच्या विभागांमधील नाल्यांची सफाई झालेली नसून यामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची भीती या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. ज्या विभागांमध्ये नाल्यांची सफाई झालेली नाही, अशा विभागांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नगरसेवक आमदार पराग शाह, बिंदु त्रिवेदी, सुनिता यादव, अभिजित सामंत, लिना पटेल देहेरकर, नेहल शाह, सेजल देसाई, अनिता पांचाळ, महादेव शिवगण, कमलेश यादव, नील सोमय्या, हेतल गाला, हर्ष पटेल, प्रियंका मोरे, प्रकाश मोरे, रेणू हंसराज, रजनी केणी, प्रविण शाह, सुधा सिंह, साक्षी दळवी, प्रिती सातम, दक्षा पटेल, प्रतिभा शिंदे, समिता कांबळे, सारीका पवार आणि योगिता कोळी आदी नगरसेवकांच्या विभागांमधील नाल्यांची सफाई झालेली नाही.

नाल्यांची नव्हे तर तिजोरीची सफाई!

महापौर महोदया, आयुक्त महोदय आता तरी जागे व्हा आणि नालेसफाई करा! या सर्व नाल्यांची सफाई करताना भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक या कामी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करतील, असे भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरवर्षी शेकडो कोट्यवधी रुपये नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेकडून खर्च केले जातात मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. नालेसफाईचे पैसे म्हणजे कंत्राटदारांनी सत्ताधाऱ्यांबरोबर संगनमताने केलेली तिजोरी सफाई आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते आणि नामनिर्देशित नगरसवेक भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे.

(हेही वाचा : बापरे! कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या नावाखाली भलत्याच दिल्या लस! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.