शिवसेनेच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर भाजपात संशयकल्लोळ!

भाजपात मोजक्या काही नगरसेवकांवर वरिष्ठ नाराज असून त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा शिक्का मारला गेलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचे पत्तेही कापण्याचेही निश्चित मानले जात आहे.

114

भाजपाचे १५ ते २० नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत येत्या डिसेंबरमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचा फटाखा शिवसेना उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फोडल्यानंतर भाजपामध्ये संशयकल्लोळ माजला आहे. शिवसेनेच्या या गौप्यस्फोटानंतर भाजपामध्येच प्रत्येक नगरसेवकांवर संशयाने बघितले जात आहे? भाजपातून कोण फुटणार? कोण शिवसेनेत जाणार?, याची खासगीत चौकशी सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेने फोडलेल्या या फटाक्याच्या मोठ्या आवाजामुळे भाजपामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. भाजपामध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

‘या’ नगरसेवकांवर लक्ष!

शिवसेनेचे उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सोमवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, भाजपाचे काही नगरसेवक वरिष्ठांच्या नेतृत्वाला कंटाळले असल्याने ते शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याचे म्हणाले. यावेळी त्यांनी डिसेंबर महिन्याचा मुहूर्त सांगून १५ ते २० नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले. यावर भाजपामध्ये अंतर्गत दबक्या आवाजात कोण फुटणार आणि कोण जाणार याचीच कुजबुज सुरु आहे. तसेच जे काठावर आहेत आणि ज्यांचा आधीच तिकीट कापण्याचा विचार होता, त्यांच्यावरच आता अधिक लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा : रस्ते आणि फुटपाथवरील चरींमध्ये ६० कोटींची भरणी)

भाजपात मोजक्या काही नगरसेवकांवर वरिष्ठ नाराज

प्रत्येक नगरसेवकांवर आता वरिष्ठ नेत्यांचीही नजर असून आपल्या नेतृत्वाखाली नगरसेवक फुटणार नाही ना, याचीही चाचपणी प्रत्येक आमदार आणि खासदार घेताना दिसत आहे. भाजपात मोजक्या काही नगरसेवकांवर वरिष्ठ नाराज असून त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा शिक्का मारला गेलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचे पत्ते कापण्याचेही निश्चित मानले जात आहे. त्यातच याच काही नगरसेवकांना आमदार आणि खासदारांकडून योग्यप्रकारे वागणूक दिली जात नाही. आमदार व खासदार योग्यप्रकारची वागणूक देत नसल्याने आता या नगरसेवकांनीही जनतेमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा  नाही. परंतु पक्षातील काही लोकप्रतिनिधींकडून अशाप्रकारे मिळणारी वागणूक आणि त्यातच त्यांच्याकडून तिकीट कापण्याचा होणारा प्रयत्न पाहता विद्यमान नगरसेवकांना दुसऱ्या पक्षाची वाट धरावी लागणार आहे.

…तर सेनेचा दावा खरा ठरेल!

त्यामुळे शिवसेनेने आरोप करत एकप्रकारे भाजपाला आधीच एलर्ट केले असून त्यानंतरही जर पक्षातील नेत्यांकडून विद्यमान नगरसेवकांना सन्मानाची वागणूक न  मिळाल्यास शिवसेनेने केलेला गौप्यस्फोट प्रत्यक्षात खरा झालेला दिसेल, अशीही चर्चा आता दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याबाबत स्थायी समिती अध्यक्षांनी फुसके बार हवेत फोडून स्वप्नरंजन करण्यापेक्षा मुंबईकरांच्या समस्या सोडवाव्यात. जनतेच्या समस्या सोडवू शकत नाहीत, ते भाजपाचे नगरसेवक काय फोडणार, असा सवाल करत भाजपाचा एकही नगरसेवक  नाराज  नाही आणि तो पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.