भाजपला सापडला नवा भिडू, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येणार?

भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

70

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपची युती 25 वर्षांहून अधिक काळ टिकली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने या आपल्या जुन्या मित्राची साथ सोडत, काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. याचमुळे आता शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप नव्या भिडूच्या शोधात असून, त्यांना आपला नवा भिडू देखील सापडला आहे. भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. भाजपचा हा नवा साथीदार दुसरा तिसरा कोणी नसून, भाजप मनसेच्या साथीने शिवसेनेला शह देण्याचा मनसुबा रचत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

म्हणून भाजप मनसेला सोबत घेऊ शकते

मागील वर्षी मनसेने आपल्या झेंड्याचा रंग बदलत आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यातच शिवसेनेच्या हिंदुत्वावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, येत्या निवडणुकीत मनसे सोबत प्रत्यक्ष किंव्हा अप्रत्यक्षपणे हातमिळवणी करण्याचा मानस भाजपचा आहे. ठाणे, नवी मुंबई, नाशिक तसेच मुंबई, यांसारख्या महत्वाच्या पालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करतील, असे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः हिंदुत्वावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपला नीलम ताईंचे चोख प्रत्त्युत्तर)

राज ठाकरे चंद्रकांत दादांना ‘त्या’ लिंक पाठवणार

मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येतील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत सुरुवातीच्या काळात घेतलेली भूमिका यामुळे उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याच्या भीतीने भाजप मनसे सोबत जाण्यास तयार नव्हते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी, जर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर नक्की विचार होऊ शकतो, असे सांगितले होते. मात्र आज खुद्द राज ठाकरे यांनीच चंद्रकांत पाटील यांना सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते त्यांना पाठवणार असल्याचे दादा म्हणाले.

चंद्रकांत दादांनी दिले संकेत

आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी देत भाजप-मनसे इकत्र येण्याचे संकेत दिले. तसेच राजकारण आणि समाजकारणात दोस्ती वेगळी आणि व्यवहार वेगळा असतो. व्यवहारात आमचे निर्णय राज्याची टीम घेत असते. मी राज्याचा अध्यक्ष आहे, पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, असेही चंद्रकांत दादा यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशाने मनविसेचे ग्रहण सुटले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.