BJP ला लोकसभेत फटका बसण्यामागे राष्ट्रवादीसोबत केलेली युती कारणीभूत; संघाच्या विवेक साप्ताहिकातून कानउघडणी 

जर 'भाजपामध्ये बाहेरून आलेले...' अशा प्रकारचा 'नॅरेटिव्ह'  तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत विरोधक यशस्वीपणे पोहोचवत असतील तर तो का पोहोचतो आहे, याचा विचार करण्यावाचून गत्यंतर नाही, असे या साप्ताहिकाने म्हटले आहे.

233

भाजपाने (BJP) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्यामुळे त्याचा जबर फटका लोकसभा निवडणुकीत बसला, असा निष्कर्षच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या विवेक साप्ताहिकाने आपल्या एका लेखात काढला आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही, असे या मुखपत्राने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीपासून संघ व भाजपा (BJP) यांच्यातील कटूता वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वप्रथम निवडणूक निकालानंतर भाजपाचे कान टोचले होते. त्यानंतर संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रानेही भाजपावर निशाणा साधला होता. आता विवेक नामक संघाच्या अन्य एका मुखपत्रानेही लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या कामगिरीला भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीला जबाबदार धरले आहे.

राष्ट्रवादीची आघाडी पटली नाही 

शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याने भाजपाने (BJP) त्याच्याशी युती करणे नैसर्गिक आहे. त्यामळे शिवसेनेने पुन्हा युतीत येणे. त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा Ashadhi Wari शांत, समावेशक परंतु रामनवमी, हनुमान जयंती शोभायात्रा हिंसक; इरफान इंजिनियर यांच्याकडून हिंदू धर्माचा अवमान)

राष्ट्रवादी हे वरकरणी मुख्य कारण

अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे, असे या मुखपत्राने म्हटले आहे.

साकल्याने विचार व्हावा 

आज पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय, याचा साकल्याने विचार होण्याची गरज आहे. याचा अर्थ बाहेरून आलेला प्रत्येक जण चुकीचा आहे असा निश्चितच नाही. कित्येक जण आज संघटनेसाठी, विचारधारेसाठी प्रभावीपणे काम करत आहेत. पक्षफोडीचा भाजपावर (BJP) आरोप करणाऱ्यांनी स्वतः महाराष्ट्रात अख्खे पक्ष फोडाफोडी करून उभारलेले आपण पाहिलेले आहेत. मात्र जर ‘भाजपामध्ये बाहेरून आलेले…’ अशा प्रकारचा ‘नॅरेटिव्ह’  तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत विरोधक यशस्वीपणे पोहोचवत असतील तर तो का पोहोचतो आहे, याचा विचार करण्यावाचून गत्यंतर नाही, असे या साप्ताहिकाने म्हटले आहे.

आणीबाणीचा मुद्दा प्रभावी ठरेल का?

या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने (BJP)  आणीबाणीविरोधी संघर्ष आणि राम मंदिर आंदोलनात दिलेल्या योगदानाचे ‘नॅरेटीव्ह’ तरुण मतदारांच्या पचनी पडेल का, असा सवालही या लेखात उपस्थित करण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.