मराठी माणसाच्या जीवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे हे भाजपा कदापि खपवून घेणार नाही. स्थानिक भूमिपुत्राला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे, त्यासाठी भाजपा त्यांच्या पाठीशी कायम आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने बांगलादेशी घुसखोरांवर, जे भारतीय नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी असून या विषयाचा पाठपुरावा केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिला.
दादरमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या समर्थनात भाजप मैदानात उतरली असून घुसखोर, बांगलादेशी, रोंहिग्या फेरीवाला हटाव आणि दादर बचाव आदींसाठी भाजप मुंबई विधानसभा क्षेत्राच्यावतीने धरणे आंदोलन दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकासमोर करण्यात आले होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मुंबई भाजपा सचिव जितेंद्र राऊत, माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर, मुरजी पटेल, महेश मुदलीयार आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(हेही वाचा देशात ‘लव्ह जिहाद’चा उच्छाद; ५ वर्षांत ४०० प्रकरणे; देशपातळीवर धर्मांतरविरोधी कायदा होण्याची गरज)
शमशुद्दीनला शोधा, नाहीतर आम्ही प्रसाद देऊ
घुसखोर बांगलादेशी रोहिंग्याना हटवा, दादर वाचवा…दादरकरांच्या पैशावर रोहिंग्याना पोसणाऱ्या जमालला अटक करा..! अशा घोषणा देत भाजपने दादर परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार म्हणाले, बांगलादेशमधून येवून दादरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. बांगलादेशी रोहिंगे दादागिरी करून जागा बळकावत आहेत. दादर, माहीम परिसर गल्ल्यांमधील अनधिकृत घुसखोरी केलेल्या फेरीवाल्यांना शोधून हा परिसर मोकळा करणार असल्याचे सांगून महापालिका आणि पोलीस प्रशासनाने गरीब प्रामाणिक फेरीवाल्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवू नये असेही ते म्हणाले. तुम्ही शमशुद्दीनला शोधा नाहीतर आम्ही त्याला आमच्या भाषेत प्रसाद देवू अशा शब्दात आमदार ॲड. आशिष शेलार यांनी महापालिका पोलीस प्रशासनाचे कान टोचले.
महाविकास आघाडीने फेरीवाल्यांना पीएम निधीपासून ठेवले वंचित
पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरीवाल्यांसाठी सुरू केलेली योजना उद्धवजींच्या शिवसेनेने बंद केली. त्याला विरोध केला. महाविकास आघाडीच्या काळात केवळ ८ हजार फेरीवाल्यांना मदत मिळाली. तर शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात १ लाख १२ हजार स्थानिक फेरीवाल्यांना मदत मिळाली. स्थानिक फेरीवाल्यांची मदत थांबवण्यापेक्षा जमाल शमशुद्दीनला शोधा असा टोला आमदार ॲड. आशिष शेलार यांनी लगावला.
Join Our WhatsApp Community