महापालिका शाळेत भगवत गीता पठण : समाजवादी पक्षाने ‘असे’ उचलले पाऊल

128

मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठण केले जावे अशाप्रकारची मागणी भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली असून गुरुवारी ठरावाच्या सूचनेचे निवेदन महापौर किशोरी पेडणेकर यांना सादर केले. मात्र, शाळांमध्ये भगवत गीतेचे पठण करण्याच्या भाजप नगरसेविकेच्या मागणीनंतर समाजवादी पक्षही आक्रमक झाला आहे. समाजवादी पक्षाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी महापौरांना पत्र पाठवून ही ठरावाची सूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठरावाच्या सूचनेद्वारे केली मागणी

भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्य जनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते. हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे या गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठण केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील, असे भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. ठरावाच्या सुचनेचे महापौरांना सादर करण्यात आल्यानंतर भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा, कमलेश यादव यांच्यासह कोळी यांनी भगवत गीता महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर ऍड सुहास वाडकर यांना भेट दिली.

(हेही वाचा शिवसेनेच्या मूकसंमतीने अखेर मालेगावातील उर्दू घराला दिले ‘हिजाब गर्ल’चे नाव!)

समाजवादी पक्षाचा विरोध

या ठरावाच्या सूचनेची दखल समाजवादी पक्षाने घेतली असून पक्षाचे महापालिका गटनेते व आमदार रईस शेख यांनी शाळांमधून भगवत गीता पठण करण्याबाबतची जी ठरावाची सूचना मांडण्यात आली आहे, ती सूचना रद्द करण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामध्ये त्यांनी यापूर्वी गटनेत्यांच्या सभेत घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत, महानगरपालिकेच्या सभेमध्ये कोणत्याही धार्मिक शिक्षणाबाबतच्या ठरावाच्या सूचना सभागृहात स्विकारल्या जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगरसेविका योगिता कोळी यांनी मांडलेली ठरावाची सूचना रद्द करण्यात यावी. कारण भारतीय जनता पक्षाचे मुख्य हेतू धार्मिक ध्रुविकरण व नागरिकामध्ये तणाव निर्माण करून मतदारांना आकर्षित करण्याचा आहे. त्यामुळे ठरावाची सूचना रद्द करून त्यांना योग्यरीत्या उत्तर दिले पाहिजे, असे सांगत रईस शेख यांनी या ठराव सुचनेस आम्ही समाजवादी पक्षामार्फत विरोध करत असल्याचे नमुद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.