सध्या मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या बरीच कमी झाली आहे, तरीही लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला नाही. त्यामुळे आता याविरोधात राजकारण पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला करण्यासाठी स्वतः भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरणार आहे, अशी घोषणा भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
लसींचे २ डोस घेणाऱ्यांना परवानगी द्या!
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालये तसेच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अजून बंदच आहे. यावर भाजपने राज्य सरकारला इशारा दिला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
(हेही वाचा : यंदा मनसे निर्बंधांची हंडी फोडणार!)
श्रमिकांना करावा लागतोय महागडा प्रवास!
मुंबईतील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक वर्ग, दुकानदार, पत्रकार या मोजक्याच समाज घटकाला उपनगरीय लोकल प्रवासाला परवानगी नाही. कल्याण ते सीएसएमटीपर्यंतच्या रेल्वे प्रवासाला 25 रुपये लागतात. पण रेल्वे बंद असल्याने त्याच प्रवासासाठी लोकांना 250 रुपयांहून अधिकचा खर्च करावा लागत आहे. डोंबिवली, ठाणे इथल्या लोकांना कामासाठी मुंबईत यायचे झाले, तर रेल्वे सुविधा उपलब्ध नाही. 700 ते 800 रुपये टॅक्सी किंवा खासगी वाहनांसाठी जात असून नाईलाजस्तव महागडा रस्ते प्रवास करावा लागत आहे. बसने प्रवास करायचा झाला तरी मर्यादित बस फेऱ्यांमुळे तीन ते चार तासांचा वेळ प्रवासात जात असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. महिन्याला जेमतेम 15-20 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असताना कामावर जाण्यासाठी प्रवासाचा वाढीव खर्च भागवून कौटुंबिक खर्च कसा भागवायचा?, असा प्रश्न पडतो. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पत्रकार ज्यांचे लसींचे २ डोस पूर्ण झाले आहेत, त्यांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत आठवड्याभरात जर राज्य सरकारकडून या संदर्भात परवानगी दिली गेली नाही, तर भाजपच्या वतीने बोरिवली, दादर, सीएसटी, चर्चगेट आदी प्रमुख रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. यावेळी भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
(हेही वाचा : आता पेगॅसेस प्रकरणी फडणवीस सरकारच्या काळातील अधिका-यांची चौकशी होणार)
Join Our WhatsApp Community