शिवसेनेने फिरवली ‘पाठ’, भाजप देणार राजेंना ‘साथ’?

122

शिवसेनेने राज्यसभेच्या निवडणुकीच्या दुस-या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा केली आहे. त्यामुळे मविआ पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाण्याच्या संभाजीराजेंच्या आशा संपल्या आहेत. पण संभाजीराजे जर आपल्या अपक्ष भूमिकेवर ठाम असतील तर त्यांना भाजपकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजप करू शकते हा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पण आता याच गोष्टीचा फायदा भाजपला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपतींचे वंशज असलेल्या संभाजीराजेंना नाकारल्याचा मुद्दा उचलून भाजप शिवसेनेच्या विरोधात रान उठवू शकते. तसेच संभाजीराजेंना आपला पाठिंबा देऊन छत्रपती घराण्याचा सन्मान राखल्याचे सांगत मराठी समाजाची मनं जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.

(हेही वाचाः ओबीसी आरक्षणासाठी पवारांची केंद्र सरकारकडे मागणी, म्हणाले…)

तिस-या जागेसाठी संघर्ष

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकींच्या जागांबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. राज्यातील राज्यसभेच्या एकूण 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपचे विधानसभेतील सध्याचे संख्याबळ बघता त्यांना 6 पैकी 2 जागांवर सहज विजय मिळवता येईल. पण समजा त्यांनी तिसरा उमेदवार मैदानात उतरवला, तर मात्र त्यांना मतांचे गणित जमवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

सर्व अधिकार फडणवीसांकडे

त्यामुळे तिसरी जागा न लढवता संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची भूमिका फडणवीस घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसे झाल्यास आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मराठा समाजाची मते खेचण्यात भाजपला यश मिळू शकते. दरम्यान राज्यसभेच्या तिस-या जागेबाबतचे सर्व अधिकार हे पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचे समजते.

(हेही वाचाः राज्यसभेसाठी शिवसेनेचे ठरलेच, ‘संजय आणि संजयच’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.