नारायण राणेंना मंत्रिपद का दिले? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुंडे भगिनी नाराज नाही, उगाच त्यांना बदनामी करू नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली, मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती नारायण राणे यांच्या शपथविधीची!! शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले, अशी चर्चा सुरु झाली, त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘राणे यांची क्षमता पाहूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे, असे सांगितले. फडणवीस नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.

चर्चांवर निर्णय होत नाही!

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजप यांची युती होणार, अशीही चर्चा सुरु होती, मात्र आता राणे यांना मंत्रिपद देऊन ही चर्चा थांबली का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेतले आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असे ते म्हणाले.

(हेही वाचा : मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा हा आहे ‘मूलमंत्र’! महाराष्ट्रात कसा होणार भाजपला फायदा?)

मुंडे भगिनींना बदनामी करू नका!

मंत्रिमंडळात विस्तारात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळाच्या यंग ब्रिगेडमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, तुम्हाला कुणी सांगितले त्या नाराज आहेत. कृपा करून त्यांना बदनाम करू नका. भाजपामध्ये आमचे सर्वोच्च नेते निर्णय करत असतात. योग्य वेळी सगळे निर्णय होतात. अकारण कोणतीही नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे फडणवीस म्हणाले.

भाजपमध्ये सूडभावना नाही!

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रवादीत आल्यानेच भाजपने सुडापोटी आपल्यावर कारवाई सुरू केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपले काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सुडभावनेने काम करण्याची प्रथा नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here