विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात कुभांड रचले जात असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी केला. यासाठी त्यांनी विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्ह सादर करून तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील सादर देखील केले होते. यावर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 125 तासांची रेकॉर्डींग ही संशयास्पद असल्याचा आरोप करून त्याची सत्यता पडताळून पाहायला हवी, असे ते म्हणाले. यावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
काय दिला पवारांना इशारा
बुधवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी पवारांना सूचक इशारा देणारं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ”आम्ही अजून खोलात गेलेलो नाही. ज्या प्रकारचा कट रचला आहे, त्यामुळे आमच्यासाठी हा विषय खोलात जाण्यासारखा आहे. आम्ही योग्य पद्धतीने पाठपुरावा करू”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा – ‘त्या’बद्दल फडवणीसांचं कौतुक करायला हवं! काय म्हणाले शरद पवार?)
काय म्हणाले पवार?
देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्ह सादर करून तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले. त्या रेकॉर्डिंगसाठी पवारांनी फडणवीसांचं कौतुक केले. त्या रेकॉर्डींगसाठी शक्तीशाली यंत्रणा कामाला लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा यंत्रणा फक्त केंद्र सरकारकडे आहेत त्यामुळे त्यांचा वापर झाला असावा, अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली. या प्रकरणी फडणवीसांनी माझं नाव देखील घेतलं. पण यात माझा काही संबंध नाही. मला देखील त्यांच्या आरोपांचा काही भाग समजला नाही, आरोपांच्या खोलात मी अद्याप गेलो नाही, पण भाजप सत्तेचा गैरवापर होत असून अशा कारवाया करत असल्याचा आरोप पवारांनी केला.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
राज्य सरकारवर देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केले होते. त्याचे पुरावे असल्याचे सांगत त्यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण यांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले. त्याबाबत पुरावे असून 125 तासांचं रेकॉर्डींग केल्याचे फडणवीसांनी सांगितलं. हे रेकॉर्डींग देखील फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. गिरीश महाजन यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना कसे फसवण्यात आले? याबाबतच सर्व रेकॉर्डींग त्यात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.